सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:16 PM2024-05-13T12:16:56+5:302024-05-13T12:17:38+5:30

६५ विहिरी, ५० विंधन विहिरी अधिग्रहित

Water scarcity in the western part of Satara district, 3 lakh people are quenching their thirst on tankers | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

सातारा : पावसाने ओढ दिल्यामुळे या वर्षीची पाणीटंचाई जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागालाही जाणवत आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्यातही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. कष्णा-कोयनासारख्या नद्यांचे सान्निध्य लाभलेल्या कऱ्हाड तालुक्यात ४, तर पाटण तालुक्यातही ९ आणि वाई तालुक्यात ४ टँकर सुरू आहेत. याशिवाय अनेक गावांतून टँकरची मागणी नसली तरी त्या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट आहे. संपूर्ण जिल्ह्यात ४३१ टँकर सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात जून २०२३ मध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा झाला. पावसाळा संपताच पूर्वेकडील भागात पाणीटंचाई भासू लागली. पश्चिमेकडील भागातही पूर्ण क्षमतेने पाऊस झाला नाही. त्यामुळे जानेवारी, डिसेंबरपासून पाणीटंचाईची चाहूल लागली. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २०७ गावे आणि ६५३ वाड्या-वस्त्यांमधील ३ लाख २२ हजार ८८१ लोकसंख्या दुष्काळामुळे बाधित झाली आहे. यामध्ये पश्चिमेकडील वाई तालुक्यातील चार गावांतील ३०१४ गावे बाधित आहेत. मांढरदेव, गुंडेवाडी, ओहळी, बालेघर गावांचा समावेश आहे. टंचाईग्रस्त चार गावांत टँकर सुरू आहे. पाटण तालुक्यातील ७ गावांतील ४४४३ लोकसंख्या बाधित आहेत, तर ९ टँकर सुरू आहेत.

धडामवाडी, पाठवडे तर वाड्यांमध्ये जाधववाडी, जंगलवाडी, शिद्रुकवाडी वरची, काढणे, शिद्रुकवाडी, चव्हाणवाडी, नाणेगाव, घोट (फडतरवाडी), आंब्रुळकरवाडी (भोसगाव), बोपोली घाटमाथा (ढाणकल), डेरवन कोळेकरवाडी या गावांचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील गायकवाडवाडी, बामणवाडी, वानरवाडी, खोडजाईवाडी, घोलपवाडी, मस्करवाडी, चोरजवाडी या सात गावांतील ४९८६ लोकसंख्या दुष्काळाने बाधित आहे. तालुक्यात चार ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.

पाणीटंचाईमुळे २०६८४५ पशुधन बाधित

पाणीटंचाईमुळे नागरिकांना जशी झळ पोहोचते, त्याचप्रमाणे पशू-पक्ष्यांचा जीवही तहानेमुळे कासावीस होतो. या वर्षी जिल्ह्यातील तब्बल २,०६,८४५ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पशुधन १ लाख १९ हजार ७१५ माण तालुक्यातील आहे. यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत जनावरांच्या चारा आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

६५ विहिरी, ५० विंधन विहिरी अधिग्रहित

टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ६५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ५० विंधन विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Water scarcity in the western part of Satara district, 3 lakh people are quenching their thirst on tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.