पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या

By नितीन काळेल | Published: June 13, 2023 04:50 PM2023-06-13T16:50:47+5:302023-06-13T17:03:53+5:30

जिल्ह्यातील ५७ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार 

Water scarcity increased in Satara, 48 villages and 170 mansions were thirsty | पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या

पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या

googlenewsNext

सातारा : मान्सूनच्या पावसाचे अजून दमदार आगमन झाले नसल्याने टंचाईस्थितीत दररोज वाढ होत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील ४८ गावे आणि १७० वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. यासाठी ३४ टॅंकर सुरू आहेत. तर ५७ हजार नागरिक व साडे सात हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.

जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून टंचाईवरील खर्च कमी होत चालला आहे. यासाठी जलसंधारणाची कामे महत्वाची ठरली. तसेच पाऊसही वेळेवर आणि जोरदार झाला. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाला विलंब झाला आहे. त्यातच वळवाचे पाऊसही मोठ्या प्रमाणात झाले नाहीत. परिणामी मे महिन्यानंतर टंचाईची स्थिती अधिक वाढली. सध्या जून महिना मध्यावर आलातरी टंचाई निवारणासाठी टॅंकर धावू लागले आहेत. त्यातच विशेष म्हणजे मागील सहा दिवसांत जवळपास १५ नवीन गावे आणि ५० हून अधिक वाड्या टंचाईत समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे प्रशासनालाही उपायोजना राबवाव्या लागत आहेत.

जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण वगळता इतर सर्व ९ तालुक्यात टॅंकर सुरू झाले आहेत. सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात आहे. या तालुक्यातील २८ गावे आणि १६१ वाड्यांतील ४२ हजार ४२६ नागरिकांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. तर २ हजार १३० पशुधनही टॅंकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या २० टॅंकर सुरु आहेत. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, भाटकी, खडकी, धुळदेव, भालवडी, खुटबाव, मार्डी, सुरुपखानवाडी, विरळी आदी गावे आणि परिसरातील वाड्यांवर टंचाई आहे.

खटाव तालुक्यात जायगाव आणि मांजरवाडी येथे टॅंकर सुरू आहे. यावर १ हजार ९६८ नागरिक आणि २०४ पशुधन अवलंबून आहे. तर या गावांसाठी १ टॅंकर सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात एकाच गावात टंचाई निर्माण झालेली आहे. तर वाई तालुक्यात ४ गावे आणि ३ वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. मांढरदेव परिसरातील ही गावे आहेत. पाटण तालुक्यात एका वाडीत टंचाई आहे.

जावळी तालुक्यातही २ गावे आणि १ वाडी टंचाईग्रस्त आहे. सायगाव आणि केळघर सर्कलमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे. महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस पडतो. पण, या तालुक्यातही आंब्रळ, भीमनगर, तापोळा, वेळापूर आदींसह ६ गावे आणि एका वाडीसाठी टॅंकर सुरू आहे. सातारा तालुक्यातही टंचाई असून १ गाव आणि ३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कऱ्हाड तालुक्यात ५ गावांत टंचाई आहे. वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी, गायकवाडवाडी, येवतीचा समावेश आहे.

२४ विहिरी अधिग्रहण; खासगी ३२ टॅंकर...

टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण ३४ टॅंकर सुरू आहेत. त्यातील खासगी ३२ तर शासकीय २ टॅंकर आहेत. तर २४ विहिरी आणि २२ बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात ३ विहिरी आणि ६ बोअरचे अधिग्रहण झाले आहे. खटावला १, कोरेगाव २, वाई ५, पाटण १, जावळी ३, महाबळेश्वर ३ आणि कऱ्हाड तालुक्यात ६ विहिरींचे अधिगग्रहण करण्यात आलेले आहे.

Web Title: Water scarcity increased in Satara, 48 villages and 170 mansions were thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.