सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली; ३३ गावे, १११ वाड्या तहानल्या

By नितीन काळेल | Published: June 9, 2023 06:21 PM2023-06-09T18:21:15+5:302023-06-09T18:21:28+5:30

लवकर पाऊस न झाल्यास टंचाई आणखी वाढण्याचा अंदाज

Water scarcity increased in Satara district; 33 villages, 111 mansions were destroyed | सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली; ३३ गावे, १११ वाड्या तहानल्या

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली; ३३ गावे, १११ वाड्या तहानल्या

googlenewsNext

सातारा : मान्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील टंचाईत वाढ होत असून सध्या ८ तालुक्यांतील ३३ गावे आणि तब्बल १११ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. या टॅंकरवर ४० हजार नागरिक आणि ५ हजार पशुधन अवलंबून आहे. तर लवकर पाऊस न झाल्यास टंचाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी मुरत आहे. अशी कामे अधिक करून माण, खटाव, फलटण, कोरेगाव अशा दुष्काळी तालुक्यांत झाली आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे टंचाई कमी झाली आहे. यावर्षी तर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस कमी पडला. तसेच मान्सूनचा पाऊस उशिरा येणार असल्याने टंचाईत वाढ झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने मागणीप्रमाणे टँकर सुरू केले आहेत. सध्या माण, खटाव, वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावळी आणि कऱ्हाड या तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माणमधील १६ गावे आणि १०३ वाड्यांत टंचाई आहे. बिदाल, मलवडी, म्हसवड, कुकुडवाड सर्कलमध्ये टंचाई जाणवत आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, वारुगड, भाटकी, खडकी, धुळदेव, विरळी आदी गावे आणि परिसरातील वाडी वस्तींवरील लोकांना आणि पशुधनासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यात एकाच गावात टंचाई स्थिती आहे. भोसरे सर्कलमधील गावासाठी टँकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांत टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे मांढरदेव परिसरातील आहेत. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी - भोसगावला टँकर सुरू करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे.

मागील आठवड्यात १ गाव आणि एका वाडीसाठी टँकरने पणीपुरवठा केला जात होता. सध्या ६ गावे आणि एका वाडीत टंचाई निर्माण झाली आहे. आंब्रळ, भीमनगर, तापोळा, वनावली, सोळशी, वेळापूर, कोट्रोशी येथे टंचाई आहे. सातारा तालुक्यात १ गाव आणि ३ वाड्या तहानल्या आहेत. तर जावळी तालुक्यात २ गावे आणि एका वाडीसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेला आहे. कऱ्हाड तालुक्यातही टंचाई वाढली असून सध्या ५ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव आणि फलटण तालुक्यात टॅंकर सुरू नाही.

माणमध्ये १५ टॅंकरवर २६ हजार लोकांची तहान अवलंबून

जिल्ह्यात सध्या माण तालुक्यातच टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने मागणीनुसार टॅंकर सुरु केले आहेत. माणमध्ये १५ टॅंकर सुरू असून त्यावर २६ हजार ६६३ नागरिकांची तहान अवलंबून आहे. तर जिल्ह्यात सध्या ४० हजार ४१७ नागरिक आणि ५ हजार ९९ पशुधन बाधित आहे. त्यासाठी २९ टॅंकर मंजूर आहेत. तर प्रत्यक्षात २६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Web Title: Water scarcity increased in Satara district; 33 villages, 111 mansions were destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.