सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली; सव्वा लाख लोकांच्या घशाला कोरड

By नितीन काळेल | Published: August 22, 2023 05:21 PM2023-08-22T17:21:47+5:302023-08-22T17:22:09+5:30

पावसाची दडी कायम असल्याने टंचाई स्थिती वाढू लागली

Water scarcity increased in Satara district, Water supply started by tanker | सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली; सव्वा लाख लोकांच्या घशाला कोरड

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली; सव्वा लाख लोकांच्या घशाला कोरड

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात पावसाची दडी कायम असल्याने टंचाई स्थिती वाढू लागली आहे. त्यातच चारच दिवसांत नवीन २५ हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ७५ गावे आणि तब्बल ४०० वाड्यांना ७६ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर १ लाख १४ हजार नागरिक आणि ६५ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.

जिल्ह्यात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. पण, हा पाऊस पश्चिम भागातच चांगला झाला. पण, पूर्व भागात अडीच महिन्यांपासून दमदार पावसाचीच प्रतीक्षा आहे. त्यामुळे पूर्वेकडे एप्रिल महिन्यापासून सुरू झालेले टॅंकर बंद झाले नाहीत. या उलट टंचाईची दाहकता वाढत चालली आहे. जनावरांना चारा नाहीच. पण, आता पशुधनाला पाणी कोठून आणायचे याचीही विवंचना आहे. त्यातच अनेक गावांतील आणि वाड्यावस्तीवरील लोकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनेही टॅंकरचे नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या ७५ गावे आणि ४०० वाड्यांना टंचाईची झळ पोहाेचली आहे. त्यामुळे ७६ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये माण तालुक्यात भयावह स्थिती आहे. तालुक्यात १०५ गावे आहेत. त्यामधील ४५ गावे आणि ३२९ वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. यासाठी ५१ टॅंकर सुरू करण्यात आले असून यावर ७० हजार ३८८ नागरिक आणि ३९ हजार ३७६ पशुधनाची तहान अवलंबून आहे. 

खटाव तालुक्यातही टंचाईत वाढ झालेली आहे. त्यामुळे सध्या १४ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू करण्यात आला आहे. १० टॅंकरवर २० हजार नागरिक आणि ७ हजार ५४६ नागरिकांची तहान अवलंबून आहे. फलटण तालुक्यातही दाहकता वाढत चालली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढून ८ झाली आहे. तर ४७ वाड्यांनाही टॅंकरचा आधार आहे. १८ हजार नागरिक आणि १६ हजार जनावरांना टॅंकरचे पाणी देण्यात येत आहे.

सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगावात टंचाई आहे. कोरेगाव तालुक्यातही ६ गावांतील साडे तीन हाजर नागरिक आणि २ हजार जनावरांसाठी ३ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाईची स्थिती आहे. वाई ताुलक्यातही दोन गावांतील १ हजार ६८९ नागरिक आणि ४७५ पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. सध्या सातारा, पाटण, जावळी, कऱ्हाड, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यात टॅंकर सुरू नाही.

Web Title: Water scarcity increased in Satara district, Water supply started by tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.