साताऱ्यात पाणी टंचाई वाढली; चार तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु

By नितीन काळेल | Published: May 3, 2023 07:00 PM2023-05-03T19:00:59+5:302023-05-03T19:01:25+5:30

जिल्ह्यात यावर्षी एप्रिल महिन्याच्या मध्यावर टंचाई निवारणासाठी पहिला टँकर सुरू

Water scarcity increased in Satara; Tanker water supply started in four talukas | साताऱ्यात पाणी टंचाई वाढली; चार तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु

संग्रहित छाया

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात टंचाई वाढू लागली असून चार तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ६ गावे आणि २० वाड्यांसाठी हे टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरवर ७ हजार नागरिक आणि २३०३ पशुधनाची तहान अवलंबून आहे.

जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच टंचाई निवारणासाठी टँकर धावायचे. पण, मागील चार वर्षांत चित्र बदलत गेले. जलसंधारणाची कामे झाल्यामुळे टंचाईवर खर्च कमी झाला आहे. यावर्षीही जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पण, प्रत्यक्षात आराखड्यापेक्षा यंदा खर्च कमी होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात यावर्षी एप्रिल महिन्याच्या मध्यावर टंचाई निवारणासाठी पहिला टँकर सुरू झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मागणीनुसार टॅंकर सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत माण, वाई, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात टँकर सुरू आहेत.

माण तालुक्यात दोन गावे आणि १७ वाड्यांसाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बिदाल सर्कलमधील पांगरीसह १२ वाड्यांना आणि मलवडी सर्कलमधील वारुगडसह ५ वाड्यांसाठी ३ टॅंकर मंजूर करण्यात आलेले आहेत. सध्या दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरवर २५६० ग्रामस्थ अवलंबून आहेत.

वाई तालुक्यात गुंडेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी तर मांढरदेव अंतर्गत गडगेवाडीला टँकर सुरू झाला आहे. या टँकरवर १३१८ नागरिक आणि ६९० पशुधनाची तहान अवलंबून आहे.

कऱ्हाड तालुक्यातील ३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वानरवाडी, बामनवाडी आणि गोडवाडीसाठी टँकरने पाणी पोहोचविले जात आहे. यासाठी दोन टँकर मंजूर असून २६३८ नागरिक आणि १४८३ जनावरांसाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाचा तालुका असणाऱ्या पाटण तालुक्यातही एका वाडीसाठी टँकर सुरू झाला आहे. ढेबेवाडी सर्कलमधील आंब्रुळकरवाडी-भोसगावसाठी हा टँकर सुरू आहे. यावर ५४० ग्रामस्थ आणि १३० पशुधनाची तहान अवलंबून आहे.

जिल्ह्यात उन्हाळा वाढू लागला आहे. तसेच टंचाई स्थितीही वाढत चालली आहे. त्यामुळे टँकरला मागणी वाढणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

आठ विहिरी अन् २ बोअरवेलचे अधिग्रहण...

जिल्ह्यातील चार तालुक्यातील ६ गावांत पाणीटंचाई आहे. त्यामुळे तेथील विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. माणमध्ये दोन विहिरींचे अधिग्रहण झाले असून वाई तालुक्यात ३ तर पाटण तालुक्यात एक आणि वाई तालुक्यात एक विहीर व दोन बोअरवेलचे अधिग्रहण झाले आहे.

Web Title: Water scarcity increased in Satara; Tanker water supply started in four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.