Satara: धरणावर तहान; पाणी किती घाण !
By नितीन काळेल | Published: May 22, 2024 07:30 PM2024-05-22T19:30:47+5:302024-05-22T19:31:03+5:30
आंधळीत थेट उपसा : ढाकणी फिडिंग पाॅईंटवर विहिरीचा स्रोत; आरोग्य ठरतंय महत्त्वाचं
सातारा : माणमध्ये टंचाईच्या झळा तीव्र असून ७५ टक्के तालुक्याला टँकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी आंधळी धरण आणि ढाकणी तलावात फिडिंग पाॅईंट आहेत. यामधील आंधळी धरणातून थेट विद्युत मोटारीद्वारे उपसा आहे. तर ढाकणीत विहिरीतील पाणी टॅंकरमध्ये भरलं जातंय; मात्र हे पाणी किती स्वच्छ आणि किती घाण हे ठरविणे अवघड असून आरोग्याचाही प्रश्न उद्भवू शकतो.
माण तालुक्यात टंचाई स्थिती बिकट बनत चालली आहे. टंचाई निवारणासाठी टँकर रात्रं-दिवस धुरळा उडवत आहेत. तालुक्यात टँकर भरण्यासाठी प्रशासनाने फिडिंग पाॅईंट तयार केले आहेत. एक दहिवडीपासून जवळच आंधळी धरणात आहे. याठिकाणी धरणातील पाणी थेट मोटारीद्वारे टॅंकरमध्ये भरले जात असल्याचे दिसून आले आहे. या धरणात जिहे-कटापूर सिंचन योजनेचे पाणी काही महिन्यांपूर्वीच सोडण्यात आलेले. त्यामुळे धरणात साठा बऱ्यापैकी आहे; पण धरणातील थेट पाणी उचलले जात असल्याने ते लोकांना आणि जनावरांना कितपत योग्य हे ठरविणे महत्त्वाचे आहे.
कारण, पाणी हिरवे झाले आहे. तसेच पाण्याला काही प्रमाणात वासही येतोय. त्यामुळे हे पाणी लोक पित असतील तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच जनावरांनाही याची बाधा होऊ शकते. सध्या या फिडिंग पाॅईंटवरून अनेक गावांसाठी पाणी जाते. यासाठी टँकर दिवसभर उभे राहिलेले दिसतात. दररोज ४० ते ४५ टँकर भरून जातात. प्रत्येक टँकरवाल्याला खेपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यामुळे टँकर भरण्यासाठी काहीवेळा चालकांत हमरीतुमरीही होत असल्याचे सांगण्यात आले. त्यातच वीज गुल होण्याचा प्रकार होतोय. त्यामुळेही ग्रामस्थांना वेळेत पाणी मिळेल का याचीही शास्वती राहिलेली नाही.
म्हसवडपासून पश्चिमेला १० किलोमीटरवर ढाकणी तलाव आहे. या तलावात सध्या कमी पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावात विहीर असून येथेच टँकर भरण्यासाठी फिडिंग पाॅईंट तयार करण्यात आला आहे. याठिकाणीही टॅंकरची गर्दी दिसते. या ठिकाणाहून दररोज विविध टॅंकरच्या ६० ते ६५ खेपा होतात. १५, २०, ३० ते ३५ हजार लिटर क्षमतेचे हे टँकर आहेत. येथून मार्डी, इंजबाव, कारखेल, संभूखेड, धुळदेव, रांजणी आदी गावांना पाणी जाते. या फिडिंग पाॅईंटवर विहिरीतील पाणी भरले जात असल्याने तसेच पाण्यात पावडर टाकली जात असल्याने पाणी लोकांना पिण्यासाठी चांगले आहे, असे टॅंकरचालकांकडून सांगण्यात येत आहे.
आंधळीत यंत्रणाच नाही; ढाकणीत आरोग्य सेवकाची नियुक्ती..
आंधळी धरणाला भेट दिल्यावर तेथे टँकर दिसले; पण याठिकाणी शासकीय यंत्रणेचा एकही कर्मचारी दिसून आला नाही. टँकर पूर्ण भरले का, किती खेपा केल्या हे पाहणारे कोणीही नव्हते. फक्त चालक तेथे ठेवलेल्या एका वहीत नोंद करत होते. त्यावरुनच ठरवायचे कोणत्या टॅंकरच्या किती खेपा झाल्या ते. तर ढाकणी पाॅईंटवर एक आरोग्यसेवक दिसून आला. त्यांच्याकडे टॅंकरच्या नोंदी करणारी वही होती. याठिकाणी पाण्यात पावडर टाकत असल्याचे दिसून आले.
पहाटेपासून रात्रीपर्यंत टॅंकरची रांग..
या दोन्ही फिडिंग पाॅईंटवर टॅंकर भरण्यासाठी पहाटे चार-पाच वाजल्यापासून गडबड सुरू होते. ते रात्री ११ पर्यंततरी टँकर भरले जातात. आंधळी धरणातून दोन मोटारीद्वारे पाणी उपसा होतोय. तर ढाकणीत तीन मोटारी आहेत. क्षमतेनुसार टॅंकर भरण्यासाठी १५ ते ३० मिनिटांपर्यंत वेळ लागतो. त्यातच वीज गेलीतर थांबून राहावे लागते.
माण तालुक्यातील गावे १०५
टँकर सुरू गावे ७१
वाड्यांची संख्या ४३७
विहीर अधिग्रहण १६
बोअरवेल अधिग्रहण १३
टॅंकर सुरू ८५
बाधित लोकसंख्या १,२४,६२३
बाधित पशुधन १,१९,७१५
शुध्द पाणी पुरवण्याची जबाबदारी..
आंधळी धरणातील पाणी दुषित असून त्यावर थरही आहे. तसेच दुर्गंधीही येत आहे. पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात आंघोळ केल्यास अंगावर जखमाही होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील लोकांना शुध्द पाणी पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. टॅंकर भरण्यासाठी स्वच्छ पाण्याचे फिडींग पाॅईंट तयार करुन द्यावेत. तरीही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले तर तीव्र आंदोलन करु. - संजय भोसले, जिल्हाप्रमुख उध्दवसेना