सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती गंभीर; संभाव्य आराखडा तयार
By नितीन काळेल | Published: December 21, 2023 07:27 PM2023-12-21T19:27:55+5:302023-12-21T19:28:18+5:30
माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार
सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईची स्थिती गंभीर बनत असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जूनपर्यंतचा संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३५ कोटींचा खर्च येऊ शकतो. यामध्ये ५२१ टॅंकर लागू शकतात. तसेच नळपाणी पुरवठा योजना, विहिरी अधिग्रहित आदी खर्चाचा समावेश आहे. तर माण, खटाव, वाई, कोरेगाव तालुक्यात भीषणता वाढणार आहे.
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच पिके आणि पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. मागील चार वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे टंचाईवर फारसा खर्च झाला नाही. पण, यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. तसेच कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती आहे. त्यातच यंदा कमी पावसामुळे टंचाईची भीषणता वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून २०२४ पर्यंतच्या ९ महिन्यांसाठी संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार टंचाई निवारणावर ३५ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबरपासून तीन-तीन महिन्यांचा आराखडा केला आहे. त्यानुसार १ हजार ८३९ गावे आणि २ हजार १२२ वाड्यांना टंचाईची झळ पोहोचू शकते. यामध्ये नवीन ३२० विहिरी घ्याव्या लागतील. ४४ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करावी लागणार आहे. ३८ तात्पुरत्या पुरक नळपाणी पुरवठा योजना कराव्यात लागतील. तर ५२१ टॅंकर लागणार आहेत. तसेच १०८ विहिरींसाठी खोलीकरण, गाळ काढणे आणि आडवी बोअर घेणे अशी कामे करावी लागू शकतात. टंचाईच्या या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत आहे.