सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती भयावह; एक लाख लोकांची तहान टॅंकरवर
By नितीन काळेल | Published: November 24, 2023 06:44 PM2023-11-24T18:44:08+5:302023-11-24T18:45:20+5:30
उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके थांबेनात
सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके जून-जुलैमध्ये थांबतात. पण, यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील ५ तालुक्यातील सुमारे १ लाख नागरिक आणि ६९ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. सध्या हिवाळ्यातच ६७ गावे आणि २६५ वाड्या तहानल्या असल्यातरी आगामी काळात टॅंकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाई सोडलीतर जुलै महिना उजाडताच टॅंकर बंद व्हायचे. यंदा मात्र, पावसाने घात केला. त्यामुळे टंचाईची स्थिती कायम आहे. विशेषत: करुन माण तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील सहा महिन्यांपासून टॅंकरवरच अनेक गावांची तहान अवलंबून आहे.
माण तालुक्यात १०५ गावे आहेत. त्यातील ३१ गावे आणि २२८ वाड्यांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी ३५ टॅंकर सुरू असून त्यावर ४८ हाजर नागरिक आणि ५३ हजार जनावरांची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, ढाकणी, धुळदेव, कारखेल, वरकुटे - म्हसवड, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, पर्यंती, मार्डी, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, उकिर्डे, पांढरवाडी, सुरुपखानवाडी, विरळी, कुरणेवाडी या गावांसह वाड्यावस्त्यांवर टॅंकर सुरू आहे.
खटाव तालुक्यातीलही ६ गावे आणि ९ वाड्यांसाठी ३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी येथील सुमारे ५ हजार नागरिक आणि २ हजारांहून अधिक पशुधनाला टॅंकरचाच आधार आहे. तर फलटण तालुक्यात अजुनही १० गावे आणि २८ वाड्यांसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड आदी गावांतील १२ हजार नागरिक आणि ११ हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.
कोरेगाव तालुक्यात तर १९ गावांतील ३१ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, होसेवाडी, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक येथे टॅंकर सुरू आहे. वाई तालुक्यातीलही एका गावातील १२०० नागरिक आणि २८९ जनावरांना टॅंकरचा आधार आहे.
जिल्ह्यात ६१ टॅंकर सुरू..
जिल्ह्यातील माण तालुक्यात टंचाईची स्थिती भयावह आहे. त्यात आणखी वाढ होत जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६१ टॅंकरद्वारे लोकांना आणि पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय ११ आणि खासगी ५० टॅंकर आहेत. जानेवारीनंतर टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.
विहिरी अन् बोअरवेलचेही अधिग्रहण..
टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विहिरी आणि बोअरवलेचेही पाणी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १७ विहिरी आणि ३५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माणमध्ये ५ विहिरी, १० बोअरवेलचे अधिग्रहण झाले आहे. खटाव तालुक्यात ३ विहिरी, २१ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.