अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !
By admin | Published: May 17, 2016 09:31 PM2016-05-17T21:31:53+5:302016-05-18T00:06:58+5:30
५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर
अर्ध्या तालुक्यात पाणीटंचाई !
५२ गावे, ५०५ वाड्या-वस्त्यांवर समस्या : माणमध्ये तलाव कोरडे, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर
नवनाथ जगदाळे ल्ल दहिवडी
दुष्काळी माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील ५२ गावे व ५०५ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खासगी ५६ व सरकारी ३ असे ५९ टँकरद्वारे दररोज १६२ खेपा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने सध्या तरी ८२ खेपा होताना दिसत आहेत.
माण तालुक्यातील लोधवडे वगळता गंगोती, महाबळेश्वरवाडी, ढाकणी, आंधळी, राणंद या मुख्य तलावात मृत साठा राहिला आहे. ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. तालुक्यातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे दिवसभर पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.
जवळपास १८ ठिकाणी खासगी विहिरींचे पाणी अधिग्रहण करण्यात आले असून, तालुक्यातील ८७,७१३ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नव्याने मोगराळे, राणंद, पुकळेवाडी या गावाचे प्रस्ताव आले आहेत. मे महिन्यात यापुढे पाण्याची भीषणता आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेखर गोरे प्रतिष्ठानचे ८ टँकर शासनाच्या मदतीला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत.
तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी तेलकट रोगाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले होते. तर चालूवर्षी दुष्काळ असल्याने डाळिंब बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तर याहूनही गंभीर आहे. १५ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असा शासनाचा अहवाल असतानाही संबंधित कोणतीच पावले उचलताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे एकही छावणीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल झालेला नाही. गेल्या वेळीचा इतिहास पाहता छावणी चालकही पुढे येत नाहीत. कडब्याची १ पेंडी ३० ते ४० रुपये, उसाची मोळी १०० रुपये तर ओली मका ४ ते ५ रुपये किलोने मिळत आहे.
तालुक्यातील ३५,९२२ जनावरांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तब्बल १९ गावांतील जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. २२ विहिरीचे अधिग्रहण केले आहे. शेळ्या-मेंढ्याचा प्रश्नही गंभीर आहे. दिवसभर वणवण भटकूनही चारा मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नसल्याने मेंढपाळ मैलोनमैल पाण्यासाठी भटकंती करीत
आहेत. तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणीची कामे सुरू असली तरी यंत्राच्या साह्याने कामे सुरू आहेत. रोजगार हमीची कामे सुरू होण्याची गरज आहे. मजुरांसाठी काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
त्याचबरोबर माण तालुक्यातील शिंगणापूर, महिमानगड, दहिवडी, म्हसवड प्राधिकरण योजना नियमित सुरू राहण्याची गरज
आहे. तरच पाणीटंचाई जाणवणार नाही.
नेहमीचीच समस्या
माण तालुका दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. दर चार-पाच वर्षांनी तालुक्यात दुष्काळ हा ठरलेलाच आहे. त्यामुळे येथील लोकांना स्थलांतराशिवाय पर्याय राहत नाही. गेल्यावर्षीही तालुक्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा कमी झाला. परिणामी पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न जानेवारी महिन्यापासूनच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे गेल्यावर्षी दिवाळीनंतरच तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर पाण्याची समस्या आणखी तीव्र होत गेली. आतातर अर्धा तालुका पाणीटंचाईच्या समस्येशी सामना करीत आहे. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी पाणी योजना पूर्ण होण्याची गरज आहे.