सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई, ७ तालुक्यांत टँकरचा धुरळा; १६ गावे, ५० वाड्या तहानल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 01:28 PM2023-05-30T13:28:43+5:302023-05-30T13:29:00+5:30
पावसाळा सुरू होण्यास विलंब असून, कडक उन्हामुळे टंचाई वाढू लागली
सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्यास विलंब असून, कडक उन्हामुळे टंचाई वाढू लागली आहे. सध्या ७ तालुक्यातील १६ गावे आणि ५० वाड्यांसाठी १५ टँकर सुरू आहेत. सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात असून, ७ गावे आणि ४३ वाड्या तहानलेल्या आहेत. यामुळे माणमधील सुमारे १० हजार लोकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी मुरत आहे. अशी कामे अधिक करून माण, खटाव, फलटण, कोरेगाव अशा दुष्काळी तालुक्यांत पाणीटंचाई तुलनेने कमी जाणवत आहे. त्यातच चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे टंचाई कमी झाली आहे. यावर्षी तर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने मागणीप्रमाणे टँकर सुरू केले आहेत. सध्या माण, खटाव, वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांत ७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माणमधील ७ गावे आणि ४३ वाड्यांत टंचाई आहे. येथील ९ हजार ३६६ लोकांना ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बिदाल सर्कलमधील पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी गाव आणि परिसरासाठी हे टँकर सुरू आहेत. मलवडी सर्कलमध्ये वारुगड आणि म्हसवड सर्कलमधील भाटकी गावांतर्गत लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
खटाव तालुक्यात एकाच गावात टंचाई स्थिती आहे. भोसरे सर्कलमधील जायगाव येथे टँकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांत टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे मांढरदेव परिसरातील आहेत. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी - भोसगावला टँकर सुरू करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यात १ गाव आणि एका वाडीसाठी टँकरने पणीपुरवठा केला जात आहे, तर सातारा तालुक्यात १ गाव आणि ३ वाड्या तहानल्या आहेत.
१८ हजार नागरिकांना टँकरचा आधार...
कऱ्हाड तालुक्यात ४ गावांत टंचाई आहे. वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी आणि गायकवाडवाडी येथे टँकर सुरू करण्यात आले आहेत. यावर ३ हजार १५७ ग्रामस्थ आणि १ हजार ९९५ पशुधन अवलंबून आहे. जिल्ह्यात एकूण १५ टँकर सुरू असून, यावर १८ हजार ५४० नागरिक आणि ३ हजार ५६९ पशुधन अवलंबून आहे.