कोयनेतील पाणीसाठ्याचे काउंटडाऊन सुरू
By admin | Published: April 23, 2017 10:41 PM2017-04-23T22:41:19+5:302017-04-23T22:41:19+5:30
४० दिवस ३१ टीएमसी : चिंता आणखीनच गडद होणार; धरणातील पाण्याचे नियोजन होणार का?
पाटण : देशातील वीजनिर्मितीच्या प्रमुख स्त्रोतापैकी एक असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याचे सध्या झपाट्याने काउंटडाऊन सुरू असून, सध्या धरणात ३१.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
कडक उन्हाळ्यात वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सांगलीपर्यंतच्या गावांना सिंचनासाठी होणाऱ्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी कर्नाटकला दिले. त्यामुळे जूनचा पाऊस पडेपर्यंत कोयना धरणातील पाणी पुरणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचा कोयना जलाशय आहे. यावर्षी पावसाळ्यात जवळपास पूर्ण भरलेला.
त्यामुळे वर्षभराची गरज भागणार, अशी खात्री होती. तरीसुद्धा एप्रिल, मे आणि जून अखेरचे दिवस कोयना धरणातील पाण्यावर भागणार का?, अशी चिंता आताच लागून आहे. १ जूनपासून आतापर्यंत कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी ६० टीएमसी आणि सिंचनासाठी २१ टीएमसी पाणीसाठा खर्च झाला
आहे.
६ टीएमसी पाणीसाठा उन्हामुळे बाष्पीभवन होऊन वाया गेला आहे. त्यातच कोयना धरणातील पाणी कर्नाटक राज्याला देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर २ टीएमसी पाणी
कोयना धरणातून देण्यात आले म्हणूनच येत्या ४० दिवसांसाठी ३१ टीएमसी पाणी कसे पुरणार त्याचे नियोजन होणार आहे का?
आणि कोयना धरणातील पाणी कर्नाटक किंवा इतर राज्यांना सोडण्याची मागणी पुन्हा झाली तर पाणी साठ्याची चिंता आणखीनच गडद होणार, हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)
आमदारांचा विरोध डावलला...
कोयना धरणातून कर्नाटकला पाणी देऊ नये, असा ठराव जिल्ह्यातील सर्व आमदारांनी करूनही पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कोयनेतील पाणी न देण्याची विनंती केली केली आहे.