Satara- कोयना धरणातील पाणीसाठा ९१ टीएमसीच्या दिशेने, धरण भरण्याबाबत चिंताच
By नितीन काळेल | Published: September 21, 2023 03:51 PM2023-09-21T15:51:06+5:302023-09-21T15:52:07+5:30
महाबळेश्वरला ६२ मिलीमीटर पावसाची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात महाबळेश्वरला सर्वाधिक ६२ मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही ९१ टीएमसीच्या दिशेने झेप घेतली आहे. तरीही धरण भरण्यासाठी अजून १४ टीएमसी पाण्याची गरज असल्याने भरणार का याबाबत चिंता कायम आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. पश्चिम भागात पावसाने चांगली हजेरी लावली असलीतरी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. तर पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे. यामुळे खरीप हंगाम चांगल्या पद्धतीने पदरी पडेल अशी आशा नाही. आता पावसाळ्याचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे पिकांना फायदा होत आहे. त्याचबरोबर धरणातही पाण्याची सावकाशपणे आवक होत आहे. तरीही अनेक प्रमुख मोठी धरणे शंभर टक्के भरतील का याविषयी साशंकता आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे २५ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजाला ३२ आणि महाबळेश्वरला ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करतात कोयनेला ३८३३ तर नवजा येथे ५५०६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वर येथे ५२५८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रातही पाऊस पडतोय. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ७४८३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ९०.४६ टीएमसी झाला होता. गेल्या काही दिवसापासून धरणातून पाणी विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.