कोयना धरणात ९५ टीएमसीवर पाणीसाठा, विसर्ग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:06 PM2020-08-24T17:06:02+5:302020-08-24T17:07:27+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
मागील तीन आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पश्चिम भागात अधिक करुन हा पाऊस होत आहे. सुरुवातीला कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा, उरमोडी, वेण्णा नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी सारख्या प्रमुख धरणांतील साठाही वेगाने वाढू लागला.
त्यातच कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे १५ आॅगस्टपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. परिणामी कोयना, कृष्णा नदीला पूर आला. मात्र, काही दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे धरणांतही पाणी कमी येत असल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला. कोयनेचे दरवाजे १० फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. तेही बंद करण्यात आले. फक्त पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू होता. मात्र, पाऊस सुरूच आहे. पावसात जोर नसलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
रविवारी सकाळीही कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांवर होते. सहा दरवाजातून २५७७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूरू होता. तर पायथा वीजगृहातून कायमच २१०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयनेतून २७८७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.
रविवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ५७ तर जूनपासून आतापर्यंत ३९३६ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ५९ आणि आतापर्यंत ४३८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत ७६ आणि आतापर्यंत ४५१२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.