सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर ! 

By नितीन काळेल | Published: August 16, 2024 07:17 PM2024-08-16T19:17:55+5:302024-08-16T19:18:21+5:30

१० गावे ५६ वाड्यांत टंचाई : १८ हजार लोकांना आधार 

Water supply by tanker for 10 villages and 56 hamlets in Man taluka of Satara district | सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर ! 

सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर ! 

सातारा : जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात अजूनही पावसाची ओढ आहे. त्यामुळे माण तालुक्यातील १० गावे आणि ५६ वाड्यावस्त्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १८ हजार लोकांची तहान सध्या या टॅंकरवरच अवलंबून आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासूनच टॅंकरची मागणी होत होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मार्चनंतर टंचाईची स्थिती दिवसेंदिवस वाढत गेली. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची अधिक दाहकता होती. त्यानंतर फलटण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत टंचाई वाढली. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर ३ लाख ३३ हजार नागरिक आणि अडीच लाखांहून अधिक पशुधन अवलंबून होते. यासाठी शासकीय आणि खासगी मिळून २०८ टॅंकर सुरू होते. मात्र, जून महिना उजाडताच पाऊस सुरू झाला.

दरवर्षी जून महिन्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. यंदा ६ जून रोजीच पाऊस सुरू झाला. सुरुवातीला आठ दिवस पूर्व तसेच पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडला. यामुळे टंचाईची दाहकता कमी होत गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टंचाई निवारणासाठी धावत असणारे टॅंकर बंद झाले. आतापर्यंत खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कऱ्हाड, सातारा तालुक्यातील टॅंकर बंद झालेत. पण, पावसाळ्याचे अडीच महिने संपून गेले तरीही माण तालुक्यातील काही गावांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. अनेक गावांत चांगला पाऊस झाल्याने तेथील टंचाई संपलेली आहे. पण, सध्या १० गावे आणि ५६ वाड्यांसाठी १० टॅंकर सुरू आहेत. आगामी काळात या भागात चांगला पाऊस झाल्यानंतरच तेथील टॅंकर बंद होतील.

माणमध्ये तीन मंडलात टॅंकरने पाणीपुरवठा..

माण तालुक्यातील बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तेथील टॅंकर बंद झालेत. तर सध्या म्हसवड, गोंदवले बुद्रुक आणि मार्डी महसूल मंडलात टॅंकर सुरू आहेत. म्हसवड मंडलात वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी या गावांना आणि वाडीवस्तीला टॅंकरचा आधार आहे. गोंदवले मंडलात पळशी आणि जाशी येथे तर मार्डी मंडलात मार्डीसह, पर्यंती, इंजबाव आणि वाकी येथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: Water supply by tanker for 10 villages and 56 hamlets in Man taluka of Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.