रस्त्याच्या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:05+5:302021-07-07T04:48:05+5:30
पुसेगाव : सातारा - लातूर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पुसेगावमध्ये सध्या गतीने सुरू आहे. या कामासाठी गावातील रस्ता खोदण्यात आला ...
पुसेगाव : सातारा - लातूर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पुसेगावमध्ये सध्या गतीने सुरू आहे. या कामासाठी गावातील रस्ता खोदण्यात आला असून, त्यामुळे पाण्याच्या पाईपलाईन वारंवार बदलाव्या लागत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, पुसेगावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे,’ असे आवाहन सरपंच विजय मसणे व उपसरपंच पृथ्वीराज जाधव यांनी केले आहे.
पुसेगावमधून जाणाऱ्या सातारा - लातूर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या पहिल्या थराचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्यापर्यंत गावातून जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी खोदण्यात आला आहे. पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे जुने पाईप या रस्त्यात असून, रस्त्याच्या खोदकामामुळे पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत येत आहे. पुसेगावचे सरपंच विजय मसणे हे या कामाच्या ठेकेदाराच्या संपर्कात असून, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजेरी लावून पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी दक्षता घेत आहेत.
ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचारी विजय निकम व या कामावरील ठेकेदार कंपनीचे कर्मचारी स्वतः हजर राहून पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी मेहनत घेत आहेत. अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे करावी लागत असल्याने काही भागात पाणी पुरवठा एक-दोन दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुसेगाव ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
०५ पुसेगाव
फोटो-
पुसेगाव येथे सरपंचांच्या देखरेखीखाली पाणी पुरवठा कर्मचारी पाईपलाईनच्या दुरुस्तीची कामे करत आहेत.