वाठार स्टेशनला दहा दिवसांनी पाणी!
By Admin | Published: September 13, 2015 09:07 PM2015-09-13T21:07:41+5:302015-09-13T22:18:38+5:30
कोरेगाव तालुका : दुष्काळी स्थिती; चाऱ्याचाही प्रश्न गंभीर, तलाव कोरडे
वाठारस्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अत्यल्प पाऊस पडतो. सध्या तर पाझर तलाव पूर्ण रिकामे झाले आहेत. देऊर, वाठार स्टेशनसारख्या मोठ्या गावांत दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भागातील २६ गावांच्या पीक आणेवारीचा निकष स्वतंत्र लावावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. उत्तर-दक्षिण असा जवळपास ८० किलोमीटर विस्तारलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सोळशी ते पळशीमधील गावांचा समावेश होतो. तर नागझरी, रहिमतपूर हा दक्षिण भाग म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या कोरेगावच्या उत्तर भागात तालुक्याच्या इतर भागापेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु शासन दुष्काळ जाहीर करताना कोरेगाव तालुक्यातील एकत्र पीक आणेवारी घोषित करते. यामुळे दुष्काळ असून, तालुक्याच्या या भागचा निकष ५० पैशापेक्षा जास्त आणेवारी दाखवली जाते. यासाठी कोरेगाव तालुक्याच्या या भागातील गावासाठी वेगळा निकष लावून येथील पीक आनेवारी दाखवली जावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कदम यांनी केली आहे.दरम्यान, कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात नेहमीप्रमाणेच यावर्षी मान्सूनचा पाऊस अत्यल्प पडला आहे. या पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी शंभर टक्के खरिपाची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने या भागातील ९० टक्के पिके पाण्याअभावी वाया गेली आहेत. या भागात सध्या सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागासाठी असलेले छोटे पाझर तलाव पूर्ण रिकामे झाले आहेत. विहिरी कूपनलिकांतील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. देऊर, वाठार स्टेशनसारख्या मोठ्या गावांत दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. या गावांनी शासनाकडे प्रस्ताव देऊनही अद्याप गावाच्या गरजेइतपत पाणी प्रशासनाकडून मिळत नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.या भागात पडणाऱ्या अत्यल्प पावसामुळे या भागात सर्वाधिक प्रमाणात घेवडा, वाटाणा, सोयाबीन बटाटा, कांदा ही प्रमुख पिके घेतली जातात. सुरुवातीला पडलेल्या समाधानकारक पावसामुळे बऱ्याच वर्षांनंतर या भागात शंभर टक्के खरिपाची पेरणी झाली. त्यानंतर मात्र पावसाने अद्याप दडी मारली आहे. या भागातील पिके संपूर्ण वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अडचणीतून या शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी शासनाने या भागातील पीक आणेवारी स्वतंत्र काढल्यास या भागाचा समावेश दुष्काळी भागात होऊन शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर)
वाठार स्टेशन येथे पहिल्यांदा जनावरांसाठी जरंडेश्वर कारखान्याने चारा छावणी २००९ मध्ये काढली होती. सध्याची परिस्थिती २००९ च्या दुष्काळापेक्षा ही गंभीर असल्याने या भागातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाने या ठिकाणी चारा छावणी सुरू करावी. या भागातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे.
-विक्रम जाधव, वाठार स्टेशन