मायणी योजनेतून पाण्याची चोरी
By admin | Published: February 22, 2016 12:05 AM2016-02-22T00:05:35+5:302016-02-22T00:05:35+5:30
पोलिसांकडे तक्रार : ग्रामपंचायतीची कारवाई
मायणी : मायणीसह पाच गावांसाठी असणाऱ्या मायणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलमधून पाणी चोरीला जात आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या विरोधात मायणी ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार केली आहे.
मायणीसह गुंडेवाडी, मरडवाक, चितळी व मोराळे या पाच गावांसाठी येरळवाडी मध्यम प्रकल्पातून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू आहे. या योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी जागोजागी जॅकवेल बसविण्यात आलेले आहेत. याच जॅकवेलला दीड-दोन इंची छिद्र पाडून अंबवडे परिसरातील शेतकरी शेतीला पाणी देत असल्याची माहिती ग्रामपंचायतीला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सरपंच प्रकाश कणसे, महेश जाधव, अन्सार इनामदार, बाबू माळी, दादासो कचरे, सुहास माळी यांनी पाहणी केली. त्यावेळी हिंमत डोईफोडे, गणपत जाधव, शिवाजी डोईफोडे, दिलीप जाधव, बबन डोईफोडे आदी शेतकरी पाणी शेतीसाठी चोरत असल्याचे निदर्शनास आले. यासर्व शेतकऱ्यांच्या विरोधात मायणी पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत अर्ज देण्यात आला आहे.