हिरकणी पाजतेय पर्यटकांना ‘वाघ झऱ्याचं’ पाणी : श्रीक्षेत्र महाबळेश्वरच्या बनू पवार -अपेक्षेविना अविरत सेवा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:22 AM2018-03-08T00:22:21+5:302018-03-08T00:22:21+5:30
सचिन काकडे ।
सातारा : आज पाणी प्यायचं झालं तर एका बाटलीसाठी आपल्याला वीस रुपये मोजावे लागतात. मात्र, श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे राहणारी एक ‘हिरकणी’ गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांना अपेक्षेविना पाणी पाजण्याचे काम करीत आहे. बनू बाळू पवार असे या हिरकणीचे नाव असून, आर्थरसीट पॉर्इंटवरील ‘वाघ झºयावर’ त्यांचा माणुसकीचा झरा आजही अखंडपणे वाहत आहे.
महाबळेश्वर येथे अनेक ब्रिटिशकालीन पॉर्इंट आहे. यापैकी सर्वात मुख्य समजल्या जाणाºया आॅर्थरसीट पॉर्इंटकडे जाताना लागतो तो ‘टायगर स्प्रिंग्ज’ म्हणजेच वाघझरा. असे म्हटले जाते की, ब्रिटिशांनी या पॉर्इंटचा शोध लावला, त्यावेळी त्यांना या झºयावर काही वाघ पाणी पिताना आढळले. यानंतर त्यांनी या झºयाचे नामकरण ‘टायगर स्प्र्रिंग्ज’ असे केले.
श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील बाळू रामचंद्र पवार यांनी या झºयावर तब्बल चाळीस वर्षे कोणत्याही अपेक्षेविना पर्यटकांची सेवा केली. पर्यटक त्यांना आवडीने एक-दोन रुपये देऊ करत. त्यांच्या या कामात पत्नी बनू पवार यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळत असे. काही वर्षांपूर्वी बाळू पवार यांचे निधन झाल्याने बनू पवार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुले सांभाळ करीत असली तरी ऐन वार्धक्यात पती निधनाचा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. वयाची बहात्तरी ओलांडूनही त्या घरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘वाघ’ झºयावर नित्यनेमाने जाऊन पर्यटकांना पाणी पाजण्याचे काम करीत आहेत.
पतीने चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘माणुसकीचा झरा’ आज बनू पवार यांच्या रुपाने अखंडपणे वाहत आहे. कोणत्याही अपेक्षेविना बनू पवार पर्यटकांना डोंगरकपारीतील शुद्ध पाणी प्यायला देऊन त्यांची तहान भागवत आहे. या झºयाची व परिसराची त्या स्वत: स्वच्छता करतात. या कार्याची जाणीव ठेवून काही पर्यटक आजही त्यांना पाच-दहा रुपये देऊ करतात. क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बनू पवार यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे.
पर्यटकांना मिळणाºया आनंदातच माझा आनंद...
लोकांना पाणी प्यायला देणं यापेक्षा मोठं सत्कर्म नाही. पूर्वी माझे पती हे काम करीत होते. त्यांच्या निधनानंतर आता स्वत: मी हे काम करीत आहे. पूर्वी या पॉर्इंटकडे जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती. तेव्हा आम्ही चालत जायजो. आम्हाला कोणी पैसे द्यावे, हा आमचा मुळीच उद्देश नाही. झºयातील थंडगार पाणी पिल्यानंतर पर्यटकांना जो आनंद होतो, त्याचेच खूप समाधान वाटते. हे कार्य पुढे अखंडपणे सुरू राहणारा असल्याची माहिती बनू पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील बनू पवार या गेल्या अनेक वर्षांपासून आॅर्थरसीट पॉइंटवरील वाघ झºयावर पर्यटकांना पाणी देण्याचे काम करीत आहेत.