डंपरमधून पाणी गळत होतं..पोलिसांची शंका खरी ठरली!, तीन ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:43 AM2020-06-13T11:43:17+5:302020-06-13T11:44:32+5:30
महामार्गावरून डंपर वेगात निघाला होता. यावेळी डंपरमधून पाणी गळत होतं. डंपरमध्ये नक्कीच वाळू असणार अशी पोलिसांना शंका आली. ती खरी ठरली अन् डंपरसह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एका डंपरसह तीन ब्रास वाळू सुमारे १८ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला. तुषार सुरेश निकम (वय २४), राहुल विश्वनाथ इथापे (दोघे रा. देगाव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सातारा : महामार्गावरून डंपर वेगात निघाला होता. यावेळी डंपरमधून पाणी गळत होतं. डंपरमध्ये नक्कीच वाळू असणार अशी पोलिसांना शंका आली. ती खरी ठरली अन् डंपरसह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एका डंपरसह तीन ब्रास वाळू सुमारे १८ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला.
तुषार सुरेश निकम (वय २४), राहुल विश्वनाथ इथापे (दोघे रा. देगाव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यातील धोम गावातून उपसा केलेल्या वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उप निरीक्षक प्रसन्न जºहाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या. जºहाड यांनी गुरुवारी मध्यरात्री महामार्गावर पाहणी केली असता (एमएच ११ सीएच ५४४०) या डंपरमधून पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित डंपर आडवला असता त्यामध्ये वाळू आणि दोन युवक असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघा युवकांना ताब्यात घेऊन वाळू वाहतूक करण्याबाबतचा परवाना आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा त्या दोघांनी परवाना नसल्याचे सांगताच त्यांना पोलिसांनी अटक केली. निकम आणि इथापे या दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार तानाजी माने, विजय कांबळे, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, विशाल पवार यांनी केली.