पाण्यासाठी सोडलं दुश्मनीवर पाणी वॉटर कप स्पर्धेत भाग : दुरावलेल्या मित्रांकडून वाठार स्टेशन गावी पाणी फाउंडेशनचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:56 PM2018-03-26T21:56:38+5:302018-03-26T21:56:38+5:30
वाठार स्टेशन (जि. सातारा) : पंचवीस वर्षांच्या राजकारणात एकमेकांपासून दुरावलेली मने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा जुळून आली.
संजय कदम।
वाठार स्टेशन (जि. सातारा) : पंचवीस वर्षांच्या राजकारणात एकमेकांपासून दुरावलेली मने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा जुळून आली. ‘गावाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊ,’ ही भूमिका घेऊन कोरेगाव तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या वाठार स्टेशनचे दोन दिग्गज विरोधक सात वर्षांनंतर पुन्हा एक झाले. ही सर्व किमया पाणी फाउंडेशनमुळेच शक्य झाल्याची भावना दोन्ही मित्रांनी व्यक्त केली.
शालेय जीवनापासून ते राजकारणापर्यंत शोले चित्रपटातील ‘जय-वीरू’सारखी मैत्री असलेले वाठार स्टेशनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश जाधव आणि ‘रिपाइं’चे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे हे दोन मित्र सात वर्षांपूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. या काळात वाढलेल्या शत्रुत्वामुळे गावच्या विकासाला कुठंतरी खीळ घालत होती. हे दोन्ही चांगले मित्र पुन्हा एकत्र व्हावेत, यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले होते. मात्र, या प्रयत्नांना यश मिळत नव्हते.
पाणी फाउंडेशनच्या तालुका समन्वयक मोनाली शेळके आणि राहुल भोसले यांनी दोन महिन्यांपूर्वी या दोघांनाही फोनवरून जलयुक्त शिवारबाबत माहिती दिली. यासाठी आपण प्रशिक्षण घ्या, असे आवाहनही केले. अनपटवाडीत प्रशिक्षण घेण्यासाठी दोन मित्रांनी एकत्रित हजेरी लावली. गावाला आलेला दुष्काळी कलंक आता पुसायचा, हा निर्धार मित्रांनी करत राजकारणातील वैमनस्य संपवून हातात हात घालून काम करण्याचा निर्णय केला.वाठार स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे नागेश जाधव आणि माजी पंचायत समिती सदस्य अंकुशराव जाधव हे दोन नेते एकत्रित काम करत आहेत.
बस्स झालं बारमाही टँकर
वाठार स्टेशन हे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेले या भागातील प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच लोकांची गर्दी असते. त्यातच गावाची गरज भागेल एवढेही पाणी उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करावे लागते. त्यामुळे बारमाही टँकर असलेले गाव म्हणूनही गावची वेगळी ओळख आहे. ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या वॉटर कपमध्ये आता या गावानेही सहभाग घेऊन एक आदर्श प्रस्थापित करण्याचे काम केले आहे.