मातेनेच बुडविले पोटच्या गोळ्याला पाण्यात
By admin | Published: September 9, 2014 10:58 PM2014-09-09T22:58:13+5:302014-09-09T23:45:58+5:30
विडणीतील अपहरण प्रकरणाचा छडा : दीराच्या लग्नात अडथळा टाळण्यासाठी केले कृत्य
फलटण : विडणी (ता. फलटण) येथील अपहृत बाळाचा आईनेच पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आंतरजातीय विवाह झाल्याने दिराचे लग्न होण्यात अडथळा येईल, या मानसिकतेतूनच तिने बाळाला मारून टाकले. यामुळे ‘आई न तू जात वैरिणी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विडणी येथील सुप्रिया अमित मोरे (वय २०, रा. जंक्शन, वालचंदनगर, ता. इंदापूर, हल्ली रा. चिंचवड, पुणे) यांचा मुलगा रुद्र (वय एक महिना सहा दिवस) याचे शनिवारी (दि. ६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास अपहरण झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी गावात ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविली, मात्र बालक सापडले नव्हते. गावात ज्यांना मूलबाळ नाही, अशांकडेही चौकशी केली होती. त्यामुळे लोक भयभीत झाले होते. त्याच रात्री अकराच्या सुमारास घराजवळील स्वच्छतागृहाजवळील पाण्याच्या टाकीत रुद्रचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुप्रिया मोरे, तिचे आई-वडील आणि भावाला ताब्यात घेतले होते. चौकशीअंती सुप्रिया हिने स्वत:च्याच मुलाला पाण्यात बुडवून मारल्याचे सांगितले.
गर्भपाताचाही केला होता प्रयत्न
अमित व सुप्रिया यांनी पाच महिन्यांपूर्वी पुण्यात गर्भपात करण्याचाही निर्णय घेतला, मात्र डॉक्टरांनी नकार दिल्याने बाळंतपणासाठी ती माहेरी विडणी येथे आली होती. मोठ्या दिराच्या लग्नाला अडथळा येईल, त्यामुळे मूलच जिवंत ठेवले नाही तर आपले सर्व प्रश्न मिटतील व सासू-सासरेही चांगली वागणूक देतील, असा विचार करीत शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घरात कोणी नसताना तिने घराबाहेरील पाण्याच्या टाकीत रुद्रला टाकले. नंतर बाळाचे अपहरण झाल्याचा कांगावा तिने केला.