उरमोडीतून पाण्याचा विसर्ग, कोयनेचा विसर्ग ५५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:43 PM2018-08-22T12:43:02+5:302018-08-22T12:44:12+5:30
पश्चिम भागात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच उरमोडी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तर कोयना धरणाचे दरवाजे पाच फुटांपर्यंत वाढविण्यात आले असून, दुपारनंतर आणखी विसर्ग वाढणार आहे. त्यामुळे ५५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. आता काही दिवसांच्या अल्प हजेरीनंतर पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरली आहेत. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात ९५ मिलीमीटर पाऊस झाला.
धरणात १०२.७६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळपासून धरणाचे दरवाजे पाच फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. सहा दरवाजांतून व पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरीही पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी दोनपासून पाण्याचा विसर्ग ५५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. तर उरमोडी धरणातून यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात ९.७८ टीएमसी पाणीसाठा असून, एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. धरण ९८.११ टक्के इतके भरले आहे.
बुधवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.७२ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.४४, बलकवडी ३.९८ तर तारळी धरणात ५.५९ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून पुन्हा पाणी सोडणे सुरू झाले आहे. तर धोम धरणातून ३२२४, कण्हेर २८०६, बलकवडी धरणातून २२७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०८ ५७२
कोयना ९५ ४७८५
बलकवडी ६२ २३९५
कण्हेर १० ६५७
उरमोडी ३५ १०९६
तारळी ३४ २००३