दीडशे एकर क्षेत्राला मिळणार पाणी !
By Admin | Published: June 26, 2015 09:58 PM2015-06-26T21:58:13+5:302015-06-26T21:58:13+5:30
जलयुक्त शिवार : उत्तर कोरेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान
वाठार स्टेशन : येथे नव्याने बांधण्यात आलेला तलाव भरून वाहत असल्याने या बंधाऱ्याचा फायदा आता शेजारील वाघोली गावच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. या शिवाय पिंपोडे बु परिसरातील जवळपास १५० एकर क्षेत्राला या बंधाऱ्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच गावातील कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
राज्य शासनच्या जलयुक्त शिवार अंतर्गत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील सोळशी ते पळशी या गावांतील वसना नदीवर बंधारे बांधण्यासाठी शासनाकडून जवळपास ६० लाखांचा निधी मंजूर झाला असून, या टप्प्यातील पिंपोडेमधील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यातील गाळ काढणे, खोलीकरण व सरळीकरण काम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने या धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)