डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 01:42 PM2018-07-05T13:42:41+5:302018-07-05T13:43:28+5:30

निसर्गसौंदर्याचं मोठं वरदान लाभलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात असंख्य पर्यटकांची पावलं सह्याद्रीच्या डोंगररांगात वळतात.

The waterfall in the bhambavali amazing | डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला

डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला

Next

सातारा : जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचं मोठं वरदान लाभलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात असंख्य पर्यटकांची पावलं सह्याद्रीच्या डोंगररांगात वळतात. अशाच प्रकारे आता पावसाने धुवांधार बरसात केल्यामुळे सह्याद्रीच्या कड्याकपायातून धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांचे पाय सह्याद्रीच्या डोंगररांगेत पडू लागले आहेत. यावरून असेच म्हणावसं वाटतं की ‘डोंगरातला धबधबा कोसळू लागला; खळखळणा-या नदीत मिसळून गेला.’ 

सातारा जिल्हा सृष्टीसौंदर्य तसेच जैवविविधतेने नटला आहे. येथे पूर्वेला पाऊस कमी आणि पश्चिमेला धुवांधार अशीही स्थिती आहे. येथील निसर्गसौंदर्याने तर भरभरून दिले आहे. त्यामुळे कास, पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा, कोयना, बामणोली या भागात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पावसाळ्यात तर या परिसरातून माघारी जाऊच नये, असे वाटून जाते. याला कारण म्हणजे पावसातील मनसोक्त भिजणं. शेकडो फुटावरून कोसळणा-या धबधब्याचं रोरावत येणं, निसर्गाची हिरवाई हे सर्वच मोहवून टाकते. आता पावसाळ्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. 

सध्या जिल्ह्यातील ठोसेघर, ओझर्डे, भांबवलीचे धबधबे भरभरून कोसळू लागले आहेत. त्यामुळे पावसाळी सहल करणा-या तरुण पर्यटक याकडे वळू लागले आहेत. सातारा शहरापासून २५ किलोमीटरवर असणारा ठोसेघर धबधबा हा जिल्ह्यातील मोठा आहे. शेकडो फुटावरून पाणी खाली पडते. येथील पर्यटकांना धबधबा पाहण्यासाठी गॅलरी केली आहे. त्यामधून या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहता येते.  कोयनानगरजवळील ओझर्डे धबधबाही पर्यटकांना वेड लावणारा आहे. दुरूनच या धबधब्यातून पडणारं पांढरं शुभ्र पाणी नजरेस पडतं. दाट, हिरव्यागार झाडीतून जाताना धबधबा पाहणं मन हरवून जाणारं असतं. 

सातारा तालुक्यातीलच भांबवलीतील वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. अलीकडेच त्याला शासनाने ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर कास पुष्प पठार आहे. भांबवलीपर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नाही. येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे. 

Web Title: The waterfall in the bhambavali amazing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.