Waterfalls in Satara: सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 01:01 PM2024-07-22T13:01:34+5:302024-07-22T13:02:34+5:30
उंब्रज पोलिसांकडून बेशिस्त व हुल्लडबाज पर्यटकांकडून २० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल
उंब्रज: सडावाघापुर ता.पाटण येथील उलटा धबधबा बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये काही पर्यटकांनी हुल्लडबाजी करून वाहतुकीचे नियम मोडले. अशा हुल्लडबाजांवर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली. २९ वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून २०,४०० रुपयांचा दंड वसूल केला.
पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा जोरदार पावसामुळे सुरू झाला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान यामध्ये काहीजण हुल्लडबाजी करत वाहतुकीचे नियम मोडत होते. यावर पोलिसांनी कारवाई केली. तारळे दूरक्षेत्र हद्दीत सडावाघापुर रोड बादवाट येथे नाकाबंदी करून २९ वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून २०,४०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
सडा वाघापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी केले.