वाठार, लोणंद परिसरात घरफोडी करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 07:48 PM2020-06-18T19:48:16+5:302020-06-18T19:49:37+5:30
लोणंद आणि वाठार परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील सहा मोबाइल व दुचाकी असा ८१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
सातारा : लोणंद आणि वाठार परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील सहा मोबाइल व दुचाकी असा ८१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
उमेश पुरंदर काळे (रा. भादे, ता. खंडाळा)असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. काळे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वाठार, लोणंद परिसरात घरफोडी केल्याचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याने सोळशीत, निरा रोडवरील एका बारमध्ये, लोणंद, पिपोंडे येथील देशी दारूच्या दुकानात चोरी केली होती.
दि. १७ रोजी वीर धरणाच्या भिंतीजवळ भादे गावाकडे जाणाऱ्या रोडवर चोरलेले मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
साबळे यांनी परिसरात सापळा लावला असता त्याठिकाणी उमेश काळे हा दुचाकीवरून तेथे आला. पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तीन मित्रांसमवेत त्याने विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे मोबाइल व दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपासासाठी वाठार पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्प पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, जोतीराम बर्गे, हवालदार मोहन नाचण, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, संजय जाधव, धीरज महाडिक, वैभव सावंत, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.