युवतीच्या खुनाच्या निषेधार्थ वाठार किरोलीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:03+5:302021-09-26T04:42:03+5:30
रहिमतपूर : ‘कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील युवतीचा चाफळ, ता. पाटण येथे एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला. या घटनेच्या ...
रहिमतपूर : ‘कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील युवतीचा चाफळ, ता. पाटण येथे एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ वाठार किरोली ग्रामस्थांनी शनिवारी सर्व व्यवहार बंद ठेवून बंद पाळला. दरम्यान, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,’ अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली.
चाफळ, ता. पाटण येथे वाठार किरोली येथील युवतीचा संशयित आरोपी अनिकेत अरविंद मोरे (वय २०, रा. शिरंबे, ता. कोरेगाव) याने एकतर्फी प्रेमातून गळ्यावर व हातावर चाकूने वार करून खून केला. या घटनेच्या निषेधार्थ वाठार किरोली येथे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्या नीता केळकर यांनी वाठार किरोली गावी येऊन संबंधित युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील चौकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी मेणबत्ती पेटवून दु:ख व्यक्त करून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांची भेट घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली, तसेच एकतर्फी प्रेमातून झालेल्या या खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ वाठार किरोली गावातील सर्व व्यवहार शनिवारी बंद ठेवून बंद पाळण्यात आला.
फोटो :
वाठार किरोली, ता. कोरेगाव येथील चौकामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मेणबत्ती पेटवून दु:ख व्यक्त करून निषेध व्यक्त केला. (छाया : जयदीप जाधव)