वाठार स्टेशन परिसराला काश्मीर रूपडं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:52+5:302021-04-15T04:38:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या वाठार स्टेशन गाव व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या वाठार स्टेशन गाव व परिसरात बुधवारी वरुणराजा चांगलाच बरसला. दुपारी अर्धा तास पडलेल्या गारांच्या पावसाने संपूर्ण शेतशिवार, रस्त्यावर बर्फाचा खच साचला होता. त्यामुळे वाठार स्टेशन परिसराने काश्मीरचं रूप साकारलं होतं, अशी स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बर्फ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
सातारा जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाला, तसेच कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात बुधवारी सकाळपासून उष्णता वाढल्याने, पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. दुपारच्या सुमारास वाठार स्टेशनसह परिसरातील विखळे, जाधववाडी गावावर वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटसह अर्धा तास पाऊस पडला, तसेच गाराही मोठ्या संख्येने पडल्या. गारामुळे संपूर्ण शेत बर्फाअच्छादित झाले होते, तर सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे दोन किलोमीटचे अंतरात बर्फच साचला होता.
बाराही महिने पाण्यासाठी टँकरची गरज असलेलं वाठार स्टेशन हे ब्रिटिशकालीन बाजरपेठेचं गाव म्हणून परिचित आहे. मात्र, बुधवारी या परिसरात गारांचा पाऊस होऊन सर्व परिसर बर्फमय झाला होता. बर्फातून मार्ग काढताना वाहन चालक वेगळाच आनंद घेत असल्याचे दिसून आले. मात्र, शेतात पडलेल्या या पावसाचा फटका ज्वारी, कांदे, टोमॅटो या पिकांना बसला आहे.
फोटो ओळ : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन व परिसरात पाऊस आणि गारा पडल्या. यामुळे परिसरात बर्फांची चादर पसरल्याचे चित्र दिसून आले. (छाया : संजय कदम)