वाझोलीत बिबट्याचा वावर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:46 AM2021-02-17T04:46:00+5:302021-02-17T04:46:00+5:30
वाझोली भागात बिबट्याचा व इतर प्राण्यांचा वावर वाढला असतानाही वन विभागाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. गत महिन्यात बिबट्याने ...
वाझोली भागात बिबट्याचा व इतर प्राण्यांचा वावर वाढला असतानाही वन विभागाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. गत महिन्यात बिबट्याने अनेक पाळीव श्वान व शेळ्या फस्त केल्या आहेत. मात्र, अन्य श्वापदांनी श्वानांची शिकार केली असावी, त्यांना ठार केले असावे, असा ग्रामस्थांचा समज होता. गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खात्री नव्हती. मात्र, सोमवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात श्वानाचा मृत्यू झाल्याने गावामध्ये दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी व ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असून, वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- चौकट
शिवारात शेतकऱ्यांचा रात्रभर पहारा
गत सहा महिन्यांपासून गावात व शेजारील भागात बिबट्याचा वावर असून, प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. वाझोलीसह आसपासच्या गावातील शेतकरी रात्रीच्यावेळी शेतामध्ये पिकाची अन्य जनावरांकडून नुकसान होऊ नये म्हणून पहारा देत आहेत. मात्र, या घटनेनंतर गावातील शेतकरी आणखी भीतीच्या छायेत गेले असून, वन विभागाने ठोस पर्याय काढून बिबट्या व अन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच अशोक मोरे यांनी केली आहे.
- चौकट
वन विभागाकडून दक्षतेच्या सूचना
वाझोली भागामध्ये जंगल पेटवल्याने जंगलातील प्राणी गावामध्ये रात्रीच्यादरम्यान वावरत आहेत. वनविभाग योग्य ती कार्यवाही करणार असून, भागातील ग्रामस्थांनी जनावरे बंद शेडमध्ये बांधावीत. रात्री शेतकऱ्यांनी एकटे शिवारात जाऊ नये. गटाने गावासह परिसरात गस्त घालावी, अशी सूचना वन विभागाकडून करण्यात आली आहे.