आम्ही सारे दाभोलकर...! नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन : अंनिस, परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे कृतिशील अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:44 PM2018-08-20T23:44:35+5:302018-08-20T23:45:24+5:30
डॉ. नरेंद्र दाभोेलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे त्यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. शाहूनगरीत सोमवारी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर घुमला.
सातारा : डॉ. नरेंद्र दाभोेलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे त्यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. शाहूनगरीत सोमवारी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर घुमला.
सातारा शहरात विविध ठिकाणी सोमवारी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शाहू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.
येथील जिजामाता अध्यापिका विद्यालयात वैज्ञानिक मनोभावांची रुजवणूक कार्यशाळा घेण्यात आली. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही कार्यशाळा झाली. ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी ‘जादूटोणाविरोधी कायदा इतिहास’ याविषयी मार्गदर्शन केले. हा कायदा झाल्यापासून ४५० गुन्हे दाखल झाले. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काय-काय करता येईल, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. व्यसनमुक्तीच्या सत्रात परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर प्रा. प्रमोदिनी मंडपे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालय, महात्मा फुले अध्यापक विद्यालय, जिजामाता अध्यापिका विद्यालयाचे १२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
सायंकाळी गोलबागेसमोर अंनिस व परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे पोस्टर प्रदर्शनाद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. मानसिक आरोग्यावर येथे पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते. सायंकाळी पाठक हॉलमध्ये जयदेव डोळे यांचे व्याख्यान झाले.
ठरलं डोळस व्हायचं...!
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले ‘ठरलं डोळस व्हायचं’ या पुस्तकातील विविध संदर्भ वक्त्यांनी दिले. या पुस्तकामध्ये बुवाबाजीवर डॉ. दाभोलकर यांनी ओढलेले आसूड याविषयीही माहिती देण्यात आली.
साताऱ्यातील राजवाडा परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन निदर्शने केली. ‘आम्ही सारे दाभोलकर’च्या घोषणा दिल्या.