Video: उदयनराजे मूडमध्ये; हसत हसत म्हणाले, सातारकर कायम 'मस्त अन् निवांत'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 10:05 PM2019-09-04T22:05:45+5:302019-09-04T22:13:39+5:30
उदयनराजेंच्या राजकारणाच्या अनेक दंतकथा आहेत. तशाच त्यांच्या राहण्या-वागण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत.
>> दीपक शिंदे
सातारा : खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार किंवा नाही ? या चर्चेने सगळे राजकीय वातावरणच बदलून गेले आहे. त्यांनी राष्ट्रवादीतच राहावे, यासाठी राज्यातील विविध भागातील नेते येऊन त्यांची मनधरणी करत आहेत. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांना विचारले 'कसे आहात... काय-काय चाललंय..' त्यावेळी त्यांनी खास सातारी शब्दातील प्रतिक्रिया दिली. 'काहीही होऊ देत सातारकरांचा एक शब्द त्यांच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, तो म्हणजे 'निवांत.'
खासदारांचा मूड बुधवारी काही वेगळाच होता. त्यांचे शासकीय विश्रामगृहावर वेगळ्याच थाटात आगमन झाले. आलिशान गाडी असताना गाडीतील टेपऐवजी जुन्या काळातील गाणी ऐकण्यासाठी घेतलेला खास टेप लावून गाणी ऐकणारे उदयनराजे आज प्रत्यक्षात लोकांना पाहायला मिळाले.
उदयनराजेंच्या राजकारणाच्या अनेक दंतकथा आहेत. तशाच त्यांच्या राहण्या-वागण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांच्याकडे एका कंपनीची आलिशान गाडी आहे. ००७ क्रमांक हा उदयनराजेंच्या गाडीची ओळख. त्यांच्यावरील प्रेमापोटी अनेक कार्यकर्त्यांनीही सात नंबरच्या क्रमांकासाठी आरटीओला लाखो रुपये मोजलेत. नंबर नाही मिळाला तर गाडीच्या काचेवर सात नंबर टाकून फिरणारेही उदयनराजेप्रेमी अनेक आहेत. या गाडीतून ते शासकीय विश्रामगृहावर आले. येताना त्यांनी गाडीतील टेप बंद ठेवला होता; पण स्वत:च्या मांडीवर एक जुन्या काळातील गाणी ऐकण्यासाठी असणारा टेप ठेवला होता. तसं म्हटलं तर त्यांच्या आलिशान गाडीत त्यांना हवी ती गाणी ऐकता येतील; पण या टेपवरील गाण्याची सर त्या गाडीतील गाण्यांना कुठून येणार. त्यामुळे त्यांनी गाडीत बसून टेप वाजवितच विश्रामगृहात प्रवेश केला. उतरताना वाहन चालकाकडे टेप देत 'सांभाळून ठेव', अशी सूचनाही केली.
थोड्याच वेळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आले. त्यांनी कोल्हापूर स्टाईलमध्ये विचारले 'काय-काय... काय चाललंय.' त्याला दिलखुलास उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, 'मस्त...निवांत...सातारकरांचा एक परवलीचा शब्द आहे. काही झाले तरी सातारकर कायम म्हणणार काही नाही निवांत... हा शब्द सातारकरांचा खास शब्द आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही', अशी प्रतिक्रिया देत त्यांनी चर्चेला सुरुवात केली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली; पण निवांत शब्दावर जे काही चालले आहे, त्याला फार काही महत्त्व देऊ नका... आमचं निवांत चाललंय, असाच भाव सांगून गेला.