'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:56 AM2019-10-15T10:56:44+5:302019-10-15T11:28:51+5:30
Maharashtra Election 2019: 'उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे भाजपात गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत.'
सातारा : उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे भाजपात गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत. सातारा हा आता गरिबांच्या हातात आला आहे. त्यामुळे आम्ही आता छत्रपतींचा वारसा चालवितो, अशी टीका महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली.
माने यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही राजेंवर जोरदार टीका केली. माने म्हणाले, दोन्ही राजे भाजपात गेले हे बरं झालं. त्यांच्या हातून साताऱ्याचा काडीचाही विकास झाला नाही. आता सातारा पालिकेत तुम्ही लक्ष घालू नका, आम्ही पालिकेत काय करायचं ते पहातो. पूवीर्सारखी राजेशाही आता राहिली नाही. त्यामुळे सर्वच राजेंच्या हातात नारळ द्यायला हवा, अशी बोचरी टीकाही लक्ष्मण माने यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती धोक्यात आली आहे, असे सांगून माने पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये ३७० कलम हटवलं पण तेथे प्रत्येक घराला सध्या टाळे लागले आहेत. कलम हटविण्यापूर्वी तेथील लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. तेथे सध्या प्रत्येक घरासमोर सैनिक उभे आहेत.
जनतेमध्ये दहशत आहे. ३७० हटवून त्यांनी राष्ट्रद्रोहच केला आहे. दसऱ्या दिवशी शस्त्रांचे पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. अत्याधुनिक यंत्राला दोरा आणि लिंबू ठेवून पूजा करणे हे आधुनिक काळात शोभते का? याचा निषेध म्हणून निवडणूक संपल्यानंतर राजवाड्यावर प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यासमोर शस्त्रांची पूजा करणार असल्याचेही माने यांनी यावेळी सांगितले.