भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आम्ही सज्ज
By admin | Published: October 27, 2014 09:44 PM2014-10-27T21:44:12+5:302014-10-27T23:44:46+5:30
दक्षता सप्ताह : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली प्रतिज्ञा
सातारा : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोमवारपासून दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ झाला. जनजागृती सप्ताहानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यादव यांनी शपथ वाचन केले.
सातारा जिल्ह्यात दि. २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह होणार आाहे. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव ‘आम्ही भारताचे लोकसेवक याद्वारे गांभीर्यपूर्वक अशी प्रतिज्ञा करतो की, आम्ही आमच्या सर्व कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा सातत्याने आटोकाट प्रयत्न करू, आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्य करू. आम्ही दक्ष राहून आमच्या संघटनेच्या वृद्धीसाठी व लौकिकासाठी कार्य करू. आमच्या सामुदायिक प्रयत्नांनी आम्ही आमच्या संघटनांना अभिमान प्राप्त करून देऊ आणि आमच्या देशबांधवांना मूल्याधिष्ठित सेवा पुरवू. आम्ही आमचे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडू आणि भय किंवा पक्षपात या विना कार्य करू,’ अशा आशयाची शपथ दिली.
शपथ दिल्यानंतर यादव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे. शासन जनतेच्या हितासाठी राबवित असलेल्या अनेकविध विकास तसेच कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करून भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी संपूर्ण समाजानेच पुढाकार घ्यायला हवा. लोकसेवक हे जनतेचे मालक नसून सेवक आहेत. त्यांनी सेवक याच भूमिकेतून आपली कर्तव्य चोखपणे पार पाडावीत.’
निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख म्हणाले, ‘अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनहित जोपासून शासकीय कामे पार पाडावीत. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकालाच सन्मानाची वागणूक देणे तितकेच महत्त्वाचे आहे.’
उपअधीक्षक श्रीहरी पाटील म्हणाले, ‘लाच देणे व घेणे हा गुन्हा असून, भ्रष्टाचार अगर लाच मागणाऱ्या लोकांविरुद्ध तक्रार करावयाची असल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा.’
यावेळी महसूल व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)