‘हम सात-सात है’; की मैत्रिपर्वाला पुन्हा उजाळा !
By admin | Published: February 23, 2017 11:23 PM2017-02-23T23:23:36+5:302017-02-23T23:23:36+5:30
कऱ्हाड तालुक्यात राजकीय त्रांगडं : काँग्रेसचा चौकार; भाजपचा षटकार; राष्ट्रवादी अन् आघाडीची सप्तपदी
प्रमोद सुकरे ---कऱ्हाड तालुक्यात मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सर्वांचीच पंचाईत झाली आहे खरी. परिणामी, सत्ता स्थापनेचं त्रांगड निर्माण झालं आहे. आघाडीशिवाय दुसरा पर्याय नाही; पण त्यासाठी कोण कोणाचं दार ठोठावणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या असून, ‘हम सात-सात है’ म्हणत राष्ट्रवादी आणि विकास आघाडी सत्तेचं समीकरण पुढे असंच चालू ठेवणार की उंडाळकर-भोसले मैत्रीला पुन्हा उजाळा देणार, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वात मोठी पंचायत समिती म्हणून कऱ्हाडकडे पाहिले जाते. चोवीस सदस्य असणाऱ्या या पंचायत समितीच्या सभापतीला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्व राहिले आहे. या तालुक्यात दोन विधानसभा मतदारसंघ असल्याने त्याचाही परिणाम पंचायत समितीच्या राजकारणावर नेहमीच होताना पाहायला मिळतो.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत दक्षिणेत तिरंगी तर उत्तरेत चौरंगी लढती पाहायला मिळाल्या. कुठे नव्हे ती काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही दक्षिणेत पाहायला मिळाली; पण तरीही त्यांना अपेक्षित यश आलेले पाहायला मिळत नाही. काँग्रेसला चार जागा तरी मिळाल्या; पण राष्ट्रवादीच्या हाताला काहीच लागल्याचे दिसत नाही. मोहिते-भोसलेंच मनोमिलनाचं वार दक्षिणेत वाहू लागल्यानंतर डॉ. अतुल भोसलेंनी कमळाच्या चिन्हावरच लढण्याचा निर्णय घेऊन टाकला. सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या सहा जागा जिंकत त्यांनी चांगले यशही मिळवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उंडाळकरांच्या विकास आघाडीने गटाच्या तीन तर गणाच्या सात जागा जिंकत आपली ताकदही दाखवून दिली आहे.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे तीन गट जिंकण्याबरोबरच पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या आहेत; पण काँग्रेसच्या हाताला कशीबशी एकच जिल्हा परिषदेची सीट लागल्याचे दिसते.
सभापती पदाचे
दावेदार तिघांकडे
पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. भाजपकडे कार्वे गणातील अर्चना गायकवाड, राष्ट्रवादीकडे मसूर गणातील शालन माळी तर उंडाळकरांच्या विकास आघाडीकडे येळगाव गणातील फरीदा इनामदार या तीन सदस्या दावेदार राहणार आहेत.
घड्याळाचा उत्तरेत गजर;
पण दक्षिणेत काटा जागेवरच
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या घड्याळाने सात जागांवर गजर केला आहे. मात्र, दक्षिणेत वाठारकर आबा, रेठरेकर दादा व उंडाळकर भाऊंनी काँग्रेसबरोबर आघाडी करूनही निकालाअंती दक्षिणेत घड्याळाचा काटा पुढे न सरकता जागेवरच थांबलेला दिसतो.
उत्तरेत कमळाने
खाते उघडले
उत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे जणू राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. येथील विद्यमान आमदारांनीही विजयाचा चौकार मारलाय. आज त्यांनी राष्ट्रवादीचे तीन जिल्हा परिषद सदस्य व सात पंचायत समिती सदस्य निवडून आणले असले तरी त्यांच्या दारात म्हणजेच वाघेरी गणात आणि सैदापूर गटात फुललेले कमळ त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेस विरोधी बाकावरच
पंचायत समितीत अवघ्या चार जागा मिळालेल्या काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता करायचे कोणी म्हटले तरी ते शक्य नाही. कारण त्यांना बरोबर घेऊन सत्तेसाठी आवश्यक संख्याबळ कोणालाच गाठता येत नाही. त्यामुळे दक्षिणेत काँग्रेसची अवस्था वाईट झाली असून, त्यांना विरोधी बाकावरच बसावे लागणार, हे निश्चित.
पूर्वेला कमळ; पश्चिमेला कपबशी
कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचा विचार करताना नेहमीच महामार्गाच्या पूर्वेचा आणि पश्चिमेचा अशी विभागणी मांडली जाते. या मतदार संघाचा भावी आमदार पूर्वेचा की पश्चिमेचा यावरही बऱ्याचदा चर्चा होते. मात्र, या निवडणुकीत महामार्गाच्या पूर्वेला कृष्णाकाठी कार्वे आणि रेठरे गटात मनोमिलनाचे कमळ फुलल्याचे पाहायला मिळाले आहे. तर महामार्गाच्या पश्चिमेला येळगाव आणि काले गटात मिळालेल्या यशानंतर उंडाळकर काका आणि कालेकर दादांनी निवांत बसून कपबशीतून चहा पित समाधान व्यक्त केले आहे म्हणे.
कऱ्हाड पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या तालुका विकास आघाडीशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या क्षणी कोणताच निर्णय जाहीर करता येणार नाही.
- डॉ. अतुल भोसले,
प्रदेश चिटणीस, भाजप
या निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मतदार संघात किती जनाधार उरला आहे, हे त्यांनीच ओळखावे. तसेच दुसऱ्या आमदाराच्या मुलाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचेही जनतेतील स्थान लक्षात आले असेलच.
- मदनराव मोहिते,
ज्येष्ठ नेते