पोलिसी दंडूक्याशिवाय आम्हाला जमतच नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:06+5:302021-03-04T05:15:06+5:30
रस्त्यावर रहदारी कमी; गरजेपुरते सिग्नल होताहेत सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरामध्ये अनेक महिन्यांपासून सर्व ...
रस्त्यावर रहदारी कमी; गरजेपुरते सिग्नल होताहेत सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरामध्ये अनेक महिन्यांपासून सर्व सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पोलीस नसल्याने वाहनचालकांची मनमानी सुरू असून, नियमांना सातारकर जुमानत नाहीत, अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
सातारा शहरामध्ये इनमीन दोन सिग्नल असून, तेही बंद अवस्थेत आहेत. ते कधी सुरू होतात तर कधी बंद पडतात. त्यामुळे अनेकदा वाहनचालकही संभ्रमात पडतात. परंतु, हे सिग्नल बंद असले तरी वाहतूक पोलीस मात्र प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, जेवणाची सुट्टी अथवा क्वचित सिग्ललजवळ पोलीस नसले की, वाहनचालक आडवी-तिडवी वाहने चालवतात. काहींना तर सिग्नलवर नियम काय असतो, हेही माहिती नाही. त्यामुळे असे वाहनचालक चौकात कुठून कसेही वळण घेऊन अपघाताला निमंत्रण देत आहेत. विशेषत: शहरातील जिल्हा परिषदेचा चौक याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. वाहतूक पोलीस हाताने वाहनांना सूचना देऊन अक्षरश: थकून जात आहेत. सिग्नल यंत्रणा सुरू असती तर पोलिसांचे काम हलके झाले असते. हीच परिस्थिती बसस्थानकाशेजारील राधिका रस्त्यावरही पाहायला मिळते. वाहनधारक आज्ञाधारक बनताहेत मात्र पोलीस निघून गेले की, नियमांची ऐसी की तैसी करत आहेत.
४८ हजार रुपये दंड
गत वर्षभरात अनेक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा वाहनचालकांकडून वाहतूक शाखेने ४८ हजारांचा दंडही वसूल केला आहे. यामध्ये अनेकजण सिग्नलवर चुकीच्या दिशेने वळण घेऊन अपघाताला कारणीभूत ठरले. शहरात सध्या फारशी वाहतूक नाही. पूर्वी जशी वाहतूक कोंडी होती तशी आता होत नाही. मोठे रस्ते आणि ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, ज्यावेळी गर्दी होते, तेव्हा सिग्नल सुरू करतो.
विठ्ठल शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक
शहरामध्ये सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे चौकात नेहमी गर्दी होते. त्यामुळे सिग्नल सुरू केले तर वाहनचालक संभ्रमात पडणार नाहीत. सर्वजण नियमांचे पालन करतील.
- नीलेश काटर, सातारा
पोलीस सिग्नलवर असल्यानंतर अनेक वाहनचालक नियम पाळतात. परंतु, पोलीस गेल्यानंतर नियम पाळत नाहीत. त्यामुळे अपघात होतात.
- सलीम मुल्ला, युवक, सातारा
सातारा बसस्थानकासमोर असलेला सिग्नल बंद आहे. हा सिग्नल खरंतर सुरू व्हायला हवा. याठिकाणी प्रचंड गर्दी असते. त्यातच सकाळच्या सुमारास याठिकाणी मंडई भरते.
- प्रदीप रजपूत, सातारा