आम्हाला बंद नको तर सवलत हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:21+5:302021-08-12T04:44:21+5:30
फलटण तालुक्यात सोमवारी २९ गावे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आली. यामध्ये तरडगावचं नाव पुन्हा पाहून व्यापारीवर्गाचं अवसानच गळून ...
फलटण तालुक्यात सोमवारी २९ गावे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आली. यामध्ये तरडगावचं नाव पुन्हा पाहून व्यापारीवर्गाचं अवसानच गळून पडलं. कारण दीड वर्षांपूर्वी जसा कोरोना उद्भवलाय तसा तो गावातून हद्दपार होण्याचं नाव घेईना. दरम्यानच्या काळात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या या पेठेत छोट्या व्यापाऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. गावातील काही दुकानदार हे व्यवसाय पूर्णवेळ होत नसल्याने तोट्यात आहेत. कारण विविध पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरले जात नाहीत. त्यामुळे वसुलीचा तगादा त्यांच्या पाठीमागे लागत आहे तसेच अनेक व्यावसायिक हे ग्रामपंचायतीच्या व खासगी व्यापारी गाळ्यात भाडेतत्त्वावर व्यवसाय करत आहेत. गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढली की प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होऊन गाव पूर्ण बंद ठेवलं जातं आहे. यामुळे गाळा भाड्याचे पैसे हकनाक वाढत आहेत तर कित्येकदा व्यवसायच बंद आहे तर पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न पडत आहे.
कोरोनाकाळात काहींनी तर आपले व्यवसाय देखील बदलले आहेत. नवीन व्यवसायात रूळण्यापूर्वीच वारंवार गाव बंदला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. पूर्ण गाव बंद न करता दुकानांसाठी ठराविक वेळ द्यावी तसेच ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले असतील त्या भागातच प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी देखील होत आहे.
(चौकट)
लोणंद पोलिसांनी केली दुकाने बंद
वारंवार होणाऱ्या बंदला विरोध करत तरडगावमधील व्यापाऱ्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे मंगळवारी सकाळी दुकाने सुरूच ठेवली होती. मात्र, दुपारी लोणंद पोलिसांनी ये दुकाने बंद करा अन्यथा कारवाई केली जाईल, असे सांगताच सर्वांनी दुकाने बंद केली.
(चौकट)
प्रशासनाचा काही गोष्टीकडे कानाडोळा
बाजारपेठेत अनेक नागरिक हे अजूनही विनामास्क फिरताना तर युवकवर्ग चौकाचौकांत गर्दी करून गप्पा मारताना दिसतात. त्यांच्यावर मात्र दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही तसेच काही रुग्ण हे लवकर विलगीकरण कक्षात दाखल न होता घरीच थांबल्याने इतरांना संसर्ग होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढली की गाव बंद होत आहे आणि याचा फटका सर्वांना बसत आहे.