आम्ही सांभाळतो मोर्चा; तुम्ही सांभाळा गाव!

By admin | Published: September 26, 2016 11:32 PM2016-09-26T23:32:18+5:302016-09-26T23:40:28+5:30

रिकाम्या गावांमध्ये दिवसा गस्त : अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस पाटील, पोलिस मित्रांचा घेणार मदत

We handle the front; Take care! | आम्ही सांभाळतो मोर्चा; तुम्ही सांभाळा गाव!

आम्ही सांभाळतो मोर्चा; तुम्ही सांभाळा गाव!

Next

वाठार स्टेशन : भावी पिढीच्या हितासाठी कित्येक पिढ्यांनंतर मराठा बांधव एकवटत आहे. सातारा महामोर्चाच्या बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली आहे. गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘आम्ही मोर्चा सांभाळतो.. तुम्ही गाव सांभाळा,’ असे आवाहन पोलिस ग्रामस्थांना करत आहेत. त्यादृष्टीने गावात पोलिस पाटील तसेच पोलिस मित्रांचा वापर केला जाणार आहे.
मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. त्यामुळे साताऱ्यातील मोर्चाही ‘न भूतो, न भविष्यती’ असा महामोर्चा निघायला हवा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चास मिळालेला प्रतिसाद पाहता साताऱ्यातील महामोर्चा इतिहास घडवेल, याची खात्री व्यक्त केली जात आहे.
महामोर्चाच्या अनुषंगाने तालुका, गाव, वाड्या-वस्त्यांवर नियोजन बैठका होत आहेत. महामोर्चात गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावे रिकामी होणार आहेत. यामुळे गावांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा राहणार आहे.
महामोर्चासाठी गावातील सर्वच तरुण, ग्रामस्थ साताऱ्याकडे जातील, त्यावेळी गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आता या गावात दिवसा गस्त घालावी लागणार आहे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र, पोलिस पाटील यांच्याकडे आता ही जबाबदारी देण्यात येणार आहे.
याच्या नियोजनासाठी लवकरच पोलिस ठाण्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत पोलिसांकडून या लोकांना या दिवशी च्या नियोजनच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
सातारा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण कामाला लागला आहे. गाव बैठकाबरोबरच वहातूक व्यवस्था, वाहतूक मार्ग, प्रवासाची वेळ, नाष्टा याबाबतचेही नियोजन सर्वच ठिकाणी सुरू आहे. पोलिस मात्र लोकांच्या सुरक्षेसाठीच्या नियोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे या काळात सुरक्षेचा भार पोलिस पाटील, पोलिस मित्रांवर येणार आहे. (वार्ताहर)

साताऱ्यातील सोमवार, दि. ३ रोजी महामोर्चा निघणार आहे. यादिवशी मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिस जाणार आहेत. गावचे गाव ओस पडणार असल्याने पोलिसाशिवाय गावाच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांची राहणार आहे. यावेळी गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र यांच्या सहकार्याने गावची सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच वाठार पोलिस ठाण्यात या सर्वांची बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत गावाच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जबाबदारी सोपवणार आहोत. महामोर्चात जे लोक सहभागी होणार आहेत, यामध्ये शक्यतो लहान मुलांचा व ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊ नये.
- शहाजी निकम,
सहायक पोलिस निरीक्षक,
वाठार पोलिस स्टेशन

आठ-दहा किलोमीटर लागणार चालावे
महामोर्चात सहभागी होणाऱ्यामध्ये प्रत्येकाला किमाण आठ ते दहा किलोमीटर चालत जाऊन शहरात जावे लागणार आहे. गर्दीतून चालावे लागणार असल्याने या दरम्यान कोणालाही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. महामोर्चातील गर्दी पाहता महामोर्चात लहान मुलं, वयोवृद्धांचा समावेश नसावा, अशा सूचनाही पोलिस यंत्रणेकडून गावोगावच्या बैठकांमध्ये केल्या जात आहेत.

पोलिस ठाणेही होणार रिकामे
मराठा महामोर्चा ‘रेकॉर्ड ब्रेक’ करण्यासाठी तरुणाई धडपडत असताना या महामोर्चाची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर राहणार आहे. महामोर्चासाठीच्या अनेक मार्गांबाबत लोकांना माहिती देण्याबरोबरच कोंडी होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांची राहणार आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पोलिस ठाणे पोलिसाविना रिकामी पडणार आहेत. याचा गैरफायदा कोणी घेऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: We handle the front; Take care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.