माझं युवाशक्तीवर भरपूर प्रेम, पण तोंडघशी पाडू नका!, अभिनेते नाना पाटेकरांचे आवाहन
By प्रमोद सुकरे | Published: October 14, 2022 05:09 PM2022-10-14T17:09:05+5:302022-10-14T17:09:47+5:30
संपत्तीची ट्रान्स्फर होईल. पण विचार आणि काम तुमचे तुम्हीच मिळवायचे आहे.
कऱ्हाड : ‘माझं युवाशक्तीवर भरपूर प्रेम आहे. म्हणूनच मी आज या युवा महोत्सवाच्या उद्घाटनाला आलो आहे. तुमच्या सगळ्यांकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत. त्या तुम्ही पूर्ण कराव्यात; पण आम्हाला तोंडघशी पाडू नये,’ असे भावनिक आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात ४२ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अॅड. रवींद्र पवार, डॉ. आर. व्ही. गुरव, प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, प्रांताधिकारी उत्तम दिघे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटेकर म्हणाले, ‘काय करायचे अन् काय नाही करायचे हे तुमच्या हातात आहे. हे तुम्हाला भोवताली समजते. मोबाईल मी माझ्या सोयीसाठी वापरत असतो. हे प्रत्येकाने केले पाहिजे. मोबाईलच्या मोहजालात न अडकता पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तकाच्या दोन ओळींच्या मधील आपली जागा आहे, हे लक्षात ठेवा. पूर्वीच्या पत्रांना भावनिक ओलावा होता. अलीकडे तंत्रज्ञानाशिवाय काहीच करता येत नाही. परंतु त्याचा वापर किती करायचा हे आपल्या हातात आहे.
शिक्षण म्हणजे स्वतःची वाट चोखाळण्याची पद्धती आहे. माझ्या पलीकडे मी जगू शकतो, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात सतत असावी. एकमेकास आपण पूरक असले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात टिकून राहण्यापेक्षा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवा. देखणे दिसणे, हे तुमच्या कामावर अवलंबून आहे. तुमच्या पाठीशी असलेली ताकद जोखा. ही ताकद आतमध्ये डोकावून पाहा. आजकाल खिडकी एवढे आभाळ आपल्या वाट्याला आले आहे, हे शोकांतिका आहे.
विचार आणि काम तुम्हीच मिळवायचे
संपत्तीची ट्रान्स्फर होईल. पण विचार आणि काम तुमचे तुम्हीच मिळवायचे आहे. कॅमेरा बाजूला असताना मी सामान्य माणूस आहे. हीच भावना मी ठेवली होती व आजही ती कायम आहे. आपल्यात जीवनाचे सर्वस्व अर्पण करणारी मंडळी असल्याने समाजात चांगलं टिकून आहे. जे माझं आहे, ते टिकवायचा प्रयत्न झाला पाहिजे. दुसऱ्याची तुलना करू नका.
आई-वडिलांची पूजा करा
तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्या आहेत, याची जाणीव ठेवा. घरातील आई-वडिलांची पूजा करा. तुम्हाला सगळे काही गवसेल. कोणतीही गोष्ट शक्य नाही हे समजू नका. सगळे काही शक्य आहे. स्वतः ला आणि समाजातील एखाद्या घटकाला जगवा. व प्रत्येक गोष्टीत आनंद घेत राहा.