समस्या सोडविण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:08+5:302021-04-22T04:40:08+5:30
मसूर : गायकवाडवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी दोनच दिवसांत टँकर सुरू करून येथील पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर समस्या सोडविण्यासाठी आम्ही ...
मसूर : गायकवाडवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी दोनच दिवसांत टँकर सुरू करून येथील पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर समस्या सोडविण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले. गायकवाडवाडी गावाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
मसूरच्या पूर्व भागातील गायकवाडवाडी या गावाची पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था झाली असून, गावात एक दिवसा आड पाणीपुरवठा होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने दोन दिवसांत टँकर सुरू करावा, अशी मागणी गायकवाडवाडी ग्रामस्थांनी केली होती. या गावच्या स्थितीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जोशी, शाखा अभियंता यांनी येथील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेऊन दोनच दिवसांत टँकर सुरू करू, अशी ग्वाही दिली.
उपसरपंच प्रवीण पवार म्हणाले, ‘आमच्या गावाचा असलेल्या पाझर तलावात गाळ साचला आहे. त्यामुळे या तलावात पाणीसाठा होत नाही. उन्हाळ्यात पूर्ण तलाव आटत आहे, हीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. आमच्या गावचा पाणीप्रश्न कायमचा मिटवायचा असेल तर तलावातील गाळ उचलायला पाहिजे, तर तलावाची उंची वाढून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल. तसेच तलावाच्या पीचिंगचे व दुरुस्तीची काम झाल्यास भविष्यात आमचे गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणारच नाही.’
यावेळी जयसिंग पवार, आक्काताई शिरतोडे, माजी सरपंच आनंदराव पवार, शिवाजी पवार, बाळकृष्ण पवार, नानासो पवार, सतीश पवार, प्रकाश पवार, धोंडिराम पवार यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. उपस्थितांचे सरपंच रेश्मा पवार यांनी स्वागत केले. माजी सरपंच शिवाजी पवार यांनी आभार मानले.
२१मसूर
गायकवाडवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याची पाहणी करताना मानसिंगराव जगदाळे, प्रणव ताटे, रमेश चव्हाण, आबासाहेब पवार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, आदी उपस्थित होते.