गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:09+5:302021-04-17T04:38:09+5:30

वाठार स्टेशन : उत्तर कोरेगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे ...

We will provide substantial assistance to the farmers affected by the hailstorm | गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ

गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ

Next

वाठार स्टेशन : उत्तर कोरेगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना दिले.

बुधवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने कलिंगड, गोट कांदा, ऊस, मिरची, भुईमूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार चव्हाण आले होते. यावेळी कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, नागेश जाधव, पिंपोडे बुद्रुकचे सरपंच नैनेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, मंडल अधिकारी उमेश डोईफोडे उपस्थित होते.

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकार दरबारी आवश्यक असलेली सर्व मदत मी स्वतः तातडीने करेन, अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी तलाठी सुहास सोनावणे, शिवाजी निकम, अशोक निकम, माजी सरपंच मच्छिंद्र केंजळे यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. गारपिटीने झालेले नुकसान खूप मोठे आहे. शेतात अर्धा ते पाऊण फूट गारांचा थर साठला होता. त्यामुळे पिकं अक्षरशः नासून गेली आहेत. गारपीट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक ठिकाणच्या गारा विरघळलेल्या नव्हत्या, यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. गोट कांद्याच्या फुलांचा जमिनीवर खच पडला होता. तर ऊस पिकाच्या पानाच्या चिंध्या झाल्या आहेत.

निसर्गाचे हे तांडव शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. लाखो रुपयांचा केलेला खर्च मातीमोल झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. सरकारने भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आमदार चव्हाण यांनी पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडीसह परिसरात पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक, तलाठी व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: We will provide substantial assistance to the farmers affected by the hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.