कमकुवत लोक मतदारांना भुलवतायत
By admin | Published: November 14, 2016 12:19 AM2016-11-14T00:19:12+5:302016-11-14T00:19:12+5:30
खासदार उदयनराजे भोसले
सातारा : ‘पात्रता नसणारे व कमकुवत लोक निवडणुकीत मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करतायत. बेंबीच्या देठापासून ओरडणारे हेच लोक नंतर मात्र तळागाळातील जनतेला विसरतात. सातारकर जनतेने अशा लोकांच्या खोट्या आश्वासनांना भुलू नये,’ असे आवाहन ‘साविआ’चे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी केले़
सातारा विकास आघाडीच्या प्रचारार्थ झालेल्या पदयात्रांमध्ये ते बोलत होते़ यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी कदम, ज्येष्ठ विधीज्ञ धैर्यशील पाटील, वंसतराव फाळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, विलास आंबेकर, अॅड़ धनंजय चव्हाण, अॅड़ आबासाहेब पवार, राजू जेधे, युवराज दबडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रभाग ३ मधील ‘साविआ’चे अधिकृत उमेदवार निशांत पाटील व रजनी जेधे, प्रभाग ४ चे उमेदवार विशाल जाधव, नीलम रणदिवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
खासदार उदयनराजे म्हणाले, ‘दुर्दैवाने निवडणुकीत काहीही आणि कितीही खोटे बोलले तरी चालते, आचारसंहितेचा भंग होत नाही़, असा काहींचा समज आहे़ मात्र जनतेच्याही आचारसंहितेची बांधिलकी महत्त्वाची मानतो. खोटी आश्वासने देत नाही. कारण मी जे बोलतो ते करून दाखवितो़ ’ (प्रतिनिधी)