छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे - दमयंतीराजे भोसले
By सचिन काकडे | Published: February 19, 2024 07:17 PM2024-02-19T19:17:45+5:302024-02-19T19:18:48+5:30
शिवजयंती निमित्त संग्रहालयात शस्त्र प्रदर्शन
सातारा : ‘युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. साताऱ्यात त्यांच्या नावाने उभे राहत असलेले संग्रहालय शहराच्या वैभवात निश्चितच भर घालेल. या संग्रहालयाचे काम गतीने सुरू असल्याचे पाहून मनस्वी आनंद होत आहे,’ असे उद्गार 'नक्षत्र'च्या अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांनी काढले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सोमवारी शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन व शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, इतिहास अभ्यासक व मोडी लीपीतज्ज्ञ घनश्याम ढाणे, संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे, जिज्ञासा मंचचे निलेश पंडित, गणेश शिंदे, महारुद्र तिकुंडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. डॉ. तेजस गर्गे यांनी ‘मराठा लष्करी स्थापत्य जागतिक वारसा नामांकन व शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर घनश्यम ढाणे यांनी कवी कलश यांच्या कार्याचा आढावा घेतला. साताऱ्याचे तख्त तसेच अन्य शिवकालीन वस्तुंची दमयंतीराजे यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी संग्रहालयाच्या कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
इतिहासप्रेमी सातारकरांचा प्रतिसाद
साताऱ्यातील संग्रहालयात साताऱ्याची गादी (तख्त), मिनियर पेंटिंग, तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखत, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघ नखे, बंदुकांचे प्रकार, संगिनी, अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, कातील बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, विविध प्रकारच्या पगड्या, शेला अशा अनेक ऐतिहासिक व शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. यापैकी ठराविक वस्तू सातारकरांना पाहण्यासाठी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी इतिहासप्रेमी सातारकरांची संग्रहालयात दिवसभर रेलचेल सुरू होती. शिवकालीन शस्त्रे जवळून पाहतानाच अनेकांनी त्यांचा इतिहास देखील अनुभवला.