कोल्हापूर, सांगलीच्या तरुणांकडे सापडली शस्त्रे, दहशत माजविण्याचा होता हेतू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:45 AM2023-08-31T11:45:33+5:302023-08-31T11:46:03+5:30
हल्ला कोणावर करायचा होता..
मल्हारपेठ : नवा रस्ता - पांढरवाडी (ता. पाटण) येथे दहशत माजविण्याच्या उद्देशाने आलेल्या कोल्हापूर, सांगलीच्या तीन तरुणांना मल्हारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कारमध्ये घातक शस्त्रास्त्रे सापडली असून, त्यामध्ये तलवार, नेपाळी कुकरी आणि सुरा या शस्त्रांचा समावेश आहे. मल्हारपेठ पोलिस ठाण्यात संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
स्वप्नील तानाजी हिप्परकर (वय २०, रा. कर्नाळ रोड, रामनगर, सांगली), सुरज भगवान कोळी (वय २६, रा. निकम गल्ली सातवे, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर), किशोर महादेव नाईक (वय २२, रा. गल्ली नंबर १, उमाजीनगर, दानोळी, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिपळूण - कऱ्हाड रस्त्यावर पांढऱ्या रंगाची कार (एमएच १०, सीए ९३५९) उभी असून, तिच्या काचा गडद काळ्या रंगाच्या आहेत. कोणीतरी संशयित व्यक्ती त्या कारमध्ये आहेत, अशी माहिती मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांच्या पथकाला तातडीने त्या ठिकाणी पाठविले. पोलिस तेथे पोहोचल्यानंतर कारचा नंबर झाकलेला दिसला.
पोलिसांनी कारचा दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतर तीन तरुण कारमध्ये बोलत बसले होते. त्यांची चाैकशी सुरू असतानाच तिघे पळून जाण्याच्या प्रयत्न करु लागले. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता, पोलिसांना स्टीलची मूठ असलेली तलवार, लाकडी मूठ असलेला सुरा, नेपाळी कुकरी अशी घातक शस्त्रे आढळली. दहशत माजविण्यासाठी ही शस्त्रे गाडीत ठेवली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
हवालदार संदीप घोरपडे यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्यावर मल्हारपेठ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार पृथ्वीराज पाटील हे करत आहेत.
हल्ला कोणावर करायचा होता...
या तीन तरुणांसोबत आणखी एक कार होती. त्या कारमध्ये चार तरुण होते. या तिघांवर कारवाई झाल्यानंतर संबंधित चाैघे जण तेथून कारसह पसार झाले. या तरुणांना नेमका कोणावर हल्ला करायचा होता, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. पोलिस त्यांच्याकडे कसून चाैकशी करत आहेत.