स्ट्रॉबेरीला हवामानाचा फटका; बुरशीनं घेरलं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:11+5:302021-02-23T04:57:11+5:30
पाचगणी : स्ट्रॉबेरी हब असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीची लज्जतच न्यारी. त्यामुळेच विदेशी पर्यटकही लालबुंद स्ट्रॉबेरीचा अस्वाद घेतात. यावर्षी मात्र ...
पाचगणी : स्ट्रॉबेरी हब असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीची लज्जतच न्यारी. त्यामुळेच विदेशी पर्यटकही लालबुंद स्ट्रॉबेरीचा अस्वाद घेतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरीची लागवड निम्म्याने घटली. तर, वातावरणातील बदलामुळे उत्पन्नात घट झाली आहे. फळाला बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील शेतक-यांची अर्थवाहिनी असलेलं स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक. यावरच येथील अर्थकारण चालतं. गेल्या वर्षीपासून आलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्;ा अनुषंगाने येथील शेतक-यांची स्ट्रॉबेरी लागवड निम्म्याने घटली. त्यात लागवडही एक महिना उशिरा झाली होती. त्यामुळे पहिला बहरसुद्धा उशिराच आला. शासनाने डिसेंबरमध्ये लॉकडाऊन उठविले. त्यावेळी स्ट्रॉबेरीचा दर ६०० ते ७०० रुपये किलो होता. परंतु, महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पन्न अल्प प्रमाणात होते. त्यामुळे याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतक-यांना झाला नाही.
आता स्ट्रॉबेरी बहरात येत असताना अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा फटका फळाला बसत आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने स्ट्रॉबेरीवर बुरशीचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच उत्पन्नात घट होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तर, दरही आता गडगडलेत. सध्या स्ट्रॉबेरी १२० ते १५० रुपये किलोच्या दरम्यान बाजारात विकली जात आहे. स्ट्रॉबेरीला दर नसल्याने शेतकरी आपलं भांडवल निघेल की नाही, या विवंचनेत सापडला आहे.
कोट :
यावर्षी शेतकरी सर्वच बाजूंनी संकटात सापडला आहे. एक तर कमी लागवड, त्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे स्ट्रॉबेरी उत्पन्नात घट झाली आहे. त्याचबरोबर बाजारभाव गडगडलाय. त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे.
- जयवंत भिलारे, शेतकरी भिलार
फोटो दि.२१पाचगणी स्ट्रॉबेरी...
फोटो ओळ : महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतक-यांत चिंता निर्माण झाली आहे. (छाया : दिलीप पाडळे)
....................................................................