पोलिसांच्या संकेतस्थळावर आता ‘सिटीझन वॉल’
By admin | Published: May 2, 2016 10:58 PM2016-05-02T22:58:53+5:302016-05-03T00:53:49+5:30
कम्पलेंट टॅबही उपयुक्त : सहा भाषांमध्ये नागरिक साधू शकणार संवाद
प्रगती जाधव-पाटील -- सातारा --जिल्हा पोलिस दलाच्या नूतन सातारा पोलिस संकेतस्थळावर नागरिकांना पोलिस दलाकडून कळविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सूचना व अलर्ट देणे सहज शक्य झाले आहे. आता पहिल्यांदाच मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलगू आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही वेबसाईट नागरिकांना पाहता येणार आहे.सातारा जिल्हा पोलिस संकेतस्थळावर अलीकडेच काही बदल करण्यात आले. नागरिकांना पोलिसांशी थेट संवाद साधता यावा, त्यांच्या सूचना तत्परतेने संबंधितांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने या संकेतस्थळावर अलीकडेच काही नवीन बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांसाठी ‘आॅनलाईन कम्पलेंट टॅब’ कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांच्या अडचणी वेळेत वरिष्ठांपर्यंत पोहोचतील हा त्यामागचा उद्देश आहे.नागरिकांना दिसून येणारे अनुचित प्रकार, गोपनीय माहिती देण्यासाठी ‘कॉन्फीडेन्शिल इन्फो’ हा स्वतंत्र टॅब तयार करण्यात आला आहे. यात नागरिकांचे नाव गोपनीय राहणार असून, अनेक प्रकारच्या अनुचित प्रकारांना वेळेत आळा घालता येणार आहे. नागरिकांनी आपल्याकडील गोपनीय माहिती या टॅबवर देणे अपेक्षित आहे. नागरिकांना सुरक्षतेबाबतच्या सूचना, ट्रॅफिक नियम, माहिती अधिकार व महिलांसाठी सुरक्षिततेसाठीच्या सुविधा व सूचना या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत.
सावध पर्यटनाचे आवाहन
सातारा जिल्ह्यात पर्यटनाची विविध ठिकाणे आहेत. अनेकदा परगावाहून येणाऱ्या पर्यटकांना या पर्यटनस्थळांवरील धोक्यांची जाणीव नसते. याचा अभ्यास करून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, तिथे असलेले धोके आणि घ्यावयाची खबरदारी याचीही इत्यंभूत माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या
कार्याचे कौतुक
सातारा जिल्ह्यामधील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या कामकाजाची दखल घेण्यासाठी ‘पॉझिटिव्ह स्टोरीज टॅब’ कार्यान्वित करण्यात आले आहे. यात संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती ‘पोलिस मॅन आॅफ दि मंथ टॅब’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.