लग्न पुढे ढकलले; पण आनंद कायम टिकवला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:45 AM2020-05-11T11:45:05+5:302020-05-11T11:46:58+5:30

माझं लग्न ५ मे रोजी होते. त्यामुळे गावाकडून बोलावले जात होते; पण आपण तेथे गेल्याने तेथील समाजाला संसर्गाचा धोका असू शकतो. हे ओळखून गावी न जाणे पसंत केले. पुणे, मुंबईहून येणाऱ्यांनी हा विचार करायला हवा. त्यामुळे गावकऱ्यांनाही त्रास होणार नाही. - महांतेश बगले, वन परिक्षेत्र अधिकारी, मेढा.

The wedding was postponed; But the joy lasted forever! | लग्न पुढे ढकलले; पण आनंद कायम टिकवला!

मेढा परिसरातील गरजू कुटुंबांना वनपरिक्षेत्र अधिकारी महांतेश बगले यांनी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले.

Next
ठळक मुद्देअनोखा उपक्रम । शंभर कुटुंबांना साहित्य वाटप

प्रशांत कोळी।

सातारा : लग्नाची तारीख ठरल्यापासून नवरा-नवरीच्या मनाची घालमेल चाललेली असते. एकीकडे अनामिक भीती तर दुसरीकडे लग्न कधी होईल, असे वाटत असते. स्वप्न रंगवण्यात मन गुंतलेलं असतं. अनेकांच्या या स्वप्नावर कोरोनाने पाणी फेरलं. पण मेढा येथील वनपरिक्षेत्रअधिकारी महांतेश बगले यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले; पण त्याचवेळी या संकटात शंभर गरजू कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आनंद द्विगुणित केला.
सांगली जिल्ह्यातील उमदी, ता. जत येथील महांतेश मल्लाप्पा बगले हे गेली अडीच वर्षांपासून सातारा जिल्ह्यात वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सध्या ते मेढा येथे कार्यरत आहेत. त्यांचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील मल्लिकार्जून बिराजदार यांची कन्या रुपाली यांच्याशी ठरला. लग्न ठरल्यापासून धामधूममध्ये तयारी सुरू होती. लग्न सोहळ्याला सर्वांना येता यावे, म्हणून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपलेल्या असतील, अशा बेताने ५ मे ही तारीख निश्चित केली.

सर्व तयारी सुरू असतानाच देशात कोरोनाचे संकट आले. लग्नाला येण्याची तर प्रत्येकांचीच इच्छा आहे. पण जास्त संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरले असते. त्यामुळे हा सोहळा दोन्ही कुटुंबांनी चर्चा करून पुढे ढकलला. पण त्याचवेळी त्यांनी कोरोनामुळे कामधंदा गेलेल्याने अडचणीत आलेल्या शंभर कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे जीवनाश्यक वस्तू दिल्या.

कातकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारी करून चालतो. मात्र लॉकडाउन झाल्याने बाजारपेठ ठप्प आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात कसलाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे ही कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी महांतेश बगले यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात दिला आहे. वस्तू मिळाल्यावर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून लग्न पुढे ढकलल्याचे काहीच वाईट वाटले नाही.


रेशनवर मिळणारे वस्तूंशिवाय सर्व
शासनाकडून गरजूंना स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ पुरवला जातो. मात्र, त्यांना इतर जीवनाश्यक वस्तूच मिळत नाहीत. त्यामुळे गहू, तांदूळ वगळता तेल, तूरदाळ, मूगदाळ, साखर, चहा पावडर, शेंगदाणे, अंगाचा साबण, कपड्यांचा साबण, मीठ, तिखट, जिरे-मोहरी दिले. त्याचप्रमाणे कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर दिले.


गरजूंची यादी तहसीलमधून
कोणत्याही वस्तूंचे वाटप करत असताना ते खऱ्या गरजूंन मदत होतेच असे नाही. हे ओळखून बगले यांनी मेढा तहसीलमधून गरजू आणि निराधार व्यक्तींची यादी मिळविली. त्यानंतर संबंधित लोकांच्या वस्ती, घरोघरी जाऊन त्यांनी या वस्तूंचे वाटप केले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे उपस्थित होते. कातकरी वस्तीवर वस्तू मिळाल्याने त्यांच्यामध्ये समादानाचे वातावरण होते.

Web Title: The wedding was postponed; But the joy lasted forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.