वीकेंड लॉकडाऊनचा एस.टी.ला एक कोटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:22 AM2021-04-14T11:22:25+5:302021-04-14T11:23:55+5:30
सातारा : दोन दिवसांच्या मिनी लॉकडाऊनमुळे एस.टी.च्या वाहतुकीच्या उत्पन्नाला मोटा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ११ आगारांमधील दोन दिवस एस.टी.च्या ...
सातारा : दोन दिवसांच्या मिनी लॉकडाऊनमुळे एस.टी.च्या वाहतुकीच्या उत्पन्नाला मोटा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ११ आगारांमधील दोन दिवस एस.टी.च्या फेऱ्या बंद ठेवल्याने सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याची माहिती एस,टी. प्रशासनाने दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या बंदचा फटका एस.टी. वाहतुकीला बसला आहे. रोज सुमारे ३५० बसच्या फेऱ्यांतून जिल्ह्यातील ११ आगारांतील रोजच्या सुमारे एक हजार २०० हून अधिक फेऱ्या होतात. या सर्व फेऱ्या दोन दिवस रद्द करण्यात आल्याने रोजचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच मार्च ते सप्टेंबर या महिन्यांतील लॉकडाऊनमुळे एस.टी. तोट्यात आली असताना पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊनचा फटका एस.टी.ला बसल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनमुळे एस.टी. वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सोमवार (दि. १२) पासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सातारा-पुणे विनाथांबा सातारा-दादर, सातारा-बोरिवली या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांची संख्या पाहून ग्रामीण भागातील वाहतुकीच्या बस सोडण्यात येत असल्याचे एस.टी. प्रशासनाने सांगितले.