कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:09 AM2021-03-13T05:09:53+5:302021-03-13T05:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रूक : कोरेगाव तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रूक : कोरेगाव तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोरेगाव तालुक्यातील आठवडे बाजार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील चारच तालुक्यांमधील हे आठवडे बाजार बंद झाल्याने हातावरचे पोट असणाऱ्या आठवडे बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक गैरसोय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले.
कोरेगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनाही निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने १२ मार्चपर्यंत शासनाने जारी केलेल्या आदेश आठवडे बाजारातील व्यापारी हे पालन करणार असून, त्यानंतर १३ मार्चपासून कोरेगाव तालुक्यातील आठवडे बाजार हे सुरू करण्यात यावेत. व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग मास्कचे व सॅनिटायझरचा वापर करण्यात येईल, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले. यावेळी तालुक्यातील आठवडा बाजार करणारे नागरिक प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. राजवंश आठवडे बाजार संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकारी ज्योती पाटील यांना आपले म्हणणे मांडण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आले की, आपले म्हणणे ऐकून विचार करण्यात येईल व ही चर्चा सकारात्मकदृष्ट्या पार पडली. यावेळी आठवडा बाजार करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.