आशियाई विजेती ललिता बाबरचे स्वागत
By admin | Published: October 6, 2014 09:52 PM2014-10-06T21:52:27+5:302014-10-06T22:42:58+5:30
पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिने ही स्पर्धा ९ मिनिटे ३५ सेकंदांमध्ये पूर्ण
सातारा : मोही, ता. माण येथील आंतरराष्टीय खेळाडू ललिता बाबर हिने दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविले. या यशानंतर ती आज (सोमवारी) प्रथमच मायदेशी परतली. तिचे सातारा जिल्हा अॅथलेटिक्स असोसएिशनतर्फे सातारा शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संजय वाटेगावकर, जिल्हा असोसिएशनचे सचिन काळे, नामदेव मोरे, राजगुरू कोचळे उपस्थित होते.
आशियाई मैदानी स्पर्धेत पदक मिळविणारी ललिता बाबर ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिने ही स्पर्धा ९ मिनिटे ३५ सेकंदांमध्ये पूर्ण केली आहे. या यशामुळे ललिता बाबर ही आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. जागतिक मैदानी स्पर्धेसाठी ललिता बाबरची निवड झाली आहे. आॅलिम्पिक तसेच जागतिक मैदानी स्पर्धेसाठी तिची तयारी सुरू आहे.
ललिता बाबर म्हणाली, ‘आशियाई स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे फारच आनंद झाला असून, मी सातारा जिल्ह्यातील असल्याचा अभिमान वाटत आहे. आगामी स्पर्धांसाठी माझा कसून सराव सुरू आहे. काहीही करून आॅलिम्पिक पदक जिंकून आणण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यादृष्टीने सराव सुरू करत आहे.’ पांडुरंग शिंदे म्हणाले, ‘ललिता बाबर हिने मिळविलेले यश जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे. तिला जागतिक मैदानी स्पर्धा आणि आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. हिला जिल्ह्यातून भरभरून मदत मिळावी, या कामास प्रारंभ म्हणून पाच हजार रुपये देत आहे. जिल्हा अॅम्युचर अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे तिला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’ वाटेगावकर म्हणाले, ‘आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने ती लवकरच स्पर्धेसाठी जाणार आहे. तिला मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी तिचा गौरव करण्यात येणार आहे.’ (प्रतिनिधी)