जन्मलेल्या कन्येचे दवाखान्यातून वाजत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:27 PM2018-08-17T23:27:06+5:302018-08-17T23:28:06+5:30
मुलगी झाल्याचे समजले तरी अनेकांच्या कपाळावर आट्या पडतात; पण सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारी चळवळीला साजेसे कार्य लोणंदमध्ये पार पडले.
सातारा : मुलगी झाल्याचे समजले तरी अनेकांच्या कपाळावर आट्या पडतात; पण सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारी चळवळीला साजेसे कार्य लोणंदमध्ये पार पडले. येथील हॉटेल व्यावसायिक सूरज कुचेकर यांना कन्यारत्न प्राप्त झाले. वाजत-गाजत, मिरवणूक काढून तिला घरी नेण्यात आले. यावेळी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जाते. लोणंदमध्ये मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी गावातून ढोलताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढली. पन्नास किलो मिठाई व साखर वाटण्यात आली. लोणंद शहरात असणाऱ्या देवीदेवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.
स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना लोणंद येथील कुचेकर कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव वाजत-गाजत मिरवणूक काढून साजरा केला. लोणंद शहराच्या विविध भागांमध्ये संध्याकाळीच्या वाजत-गाजत मिरवणूक काढली.त्यावेळी गणेश कुचेकर, उत्तम कुचेकर, बाळासाहेब भांड, रघूनाथ शेळके, गिरीश रावळ, मिलिंद घोडके, व्यंकटेश हैब्बारा, जयेश शहा, नीरज कुचेकर, पंकज खंडारे, मेहुल ढवळे, तुषार गवळी उपस्थित होते.
मुलगा-मुलगी हा भेदभाव नष्ट करण्यासाठी या आणि अशाच काही मार्गाचा अवलंब करायला पाहिजे, असं राहून-राहून वाटतं होतं. मुलगाच पाहिजे, ही धारणा समाजातून जात नाही. मुलगा वंशाचा दिवा आहे, तर मुलगी वंशाची प्राणज्योत आहे.
मुलगा आणि मुलगी असा भेद भाव करू नये. मुलगा-मुलगी समान असून, समाजाने मानसिकता बदलली पाहिजे, यासाठी आम्ही तिचे ढोल-ताशा लावून स्वागत केले, अशा भावना प्रियल कुचेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.